

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : बहुचर्चित ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनीचा सर्वेसर्वा तथा मॅनेजिंग डायरेक्टर लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार याच्यासह संचालक व प्रमुख एजंटांच्या बँक खात्यांतील व्यवहारांची चौकशी पोलिसांनी सोमवारपासून सुरू केली. कंपनीसह संबंधितांची बँक खाती गोठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कंपनीचा व्यवहार आणि काही बँक खात्यांमध्ये अनियमित व्यवहार झाल्याचा प्राथमिक निष्कर्षही पुढे आला आहे. त्यामुळे चौकशीची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुख्य संशयित सुभेदारसह त्याच्या साथीदारांना अटक करण्यासाठी पोलिसांची दोन पथके कार्यरत आहेत. बहुतांश संशयितांनी मोबाईल बंद केल्याने शोधमोहिमेत अडथळा येत आहे. काही संशयित नातेवाईक, विश्वासू सहकार्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाल्याने त्यांचाही शोध घेण्यात येत आहे.
चौकशीची व्याप्ती वाढविली
गुंतवणुकीवर दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यासह मुंबई, पुणे व अन्य राज्यांतील सुमारे लाखावर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ए. एस. ट्रेडर्सच्या प्रमुखांसह 27 जणांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पहिल्या टप्प्यात 169 तक्रारदारांनी आपली 4 कोटी 89 लाख 72 हजारांची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे.
ए. एस. ट्रेडर्सची शहरासह अन्य जिल्ह्यांतील विविध बँकांमध्ये खाती आहेत. त्यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या उलाढाली झालेल्या आहेत. काही खात्यांमध्ये अनियमितपणा झाल्याची माहितीही तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. बँकांमध्ये गुंतवणूक केलेल्या रकमांना संशयितांकडून धक्का लागू नये, याचीही पोलिसांनी दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. बँक व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार करून संबंधित खाती गोठविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सोमवारी अधिकार्यांकडून तपासाचा आढावा घेतला. संशयितांना अटक करण्यासह त्यांची बँक खाती गोठविण्यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.