इम्रान खान यांच्या कानाखाली नदीम यांनी वाजवली

इम्रान खान यांच्या कानाखाली नदीम यांनी वाजवली
Published on
Updated on

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानात 9 आणि 10 एप्रिलच्या मध्यरात्री इम्रान खान यांचे सरकार कोसळले होते. खूप काही घडले. काही समोर आले, तर काही झाकले गेले. 9 एप्रिलला रात्री इम्रान यांच्या बनीगाला या निवासस्थानाच्या हिरवळीवर एक हेलिकॉप्टर उतरले. त्यात दोन 'व्हीआयपी' होते. दोघांनी इम्रान यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. इम्रान भडकले. ऐकत नाही म्हटल्यावर संतापलेल्या एकाने इम्रान यांच्या श्रीमुखात भडकावली. नवे सरकार आल्यानंतर आता ही 'थप्पड की गूंज' पाकच्या सीमा ओलांडून आठवड्यानंतर जगभर पसरली आहे.

आता 'त्या' रात्री काय घडले ते पाहू… या रात्री इम्रान यांच्या आलीशान प्रासादात जे काही घडले त्याचे चर्वितचर्वण सोशल मीडियावर सुरू झालेलेच होते, मग 'बीबीसी उर्दू'ने खाणाखुणांच्या माध्यमातून हे वृत्त दिले. आरजू काझमी, सलीम साफी आणि असद अली तूर या तिन्ही पाकिस्तानी पत्रकारांनी मग काही सवाल केले. इम्रान यांच्या डाव्या डोळ्याखाली सूज कशाने आली? सलग दोन दिवस त्यांनी गॉगल का लावलेला होता? आग असेल तरच धूर निघतो ना… वगैरे वगैरे…पुढे 14 एपिल रोजी लष्कराच्या प्रवक्त्यावर खुलासा करण्याची वेळ आली.

असद अली तूर लिहितात, 'इम्रान यांनी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरैशी यांना आपला निरोप घेऊन लष्कर प्रमुख कमर बाजवा यांच्याकडे पाठविले. अविश्‍वास प्रस्तावावर मतदान घेण्यास अगर राजीनामा देण्यास इम्रान खान तयार नव्हते. ऐवजी संसद भंग करून नव्याने निवडणुका घ्याव्यात, असे त्यांचे मत होते. हा निरोप मिळताच बाजवा यांनी, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे (प्रस्तावार मतदान घ्या) पालन तर करावेच लागेल, असे कळवले आणि गोष्ट इथे बिघडली. एका वृत्तानुसार इम्रान जनरल बाजवा यांना बडतर्फ करून त्यांचे मित्र जनरल फैज हमीद यांना या पदावर बसवू इच्छित होते.

हमीद यांना आयएसआय प्रमुख पदावरून हटविण्यावरूनच इम्रान आणि बाजवा यांच्यातील संबंध ताणले गेले होते. सलीम साफी म्हणतात, इम्रान यांनी संरक्षण सचिवांना बोलावून बाजवा यांची बडतर्फी आणि फैज हमीद यांच्या नियुक्‍तीची अधिसूचनाही तयार टाईप करून ठेवली होती आणि रावळपिंडी लष्कर मुख्यालयातून रात्री 11 वाजता एक हेलिकॉप्टर उडाले. कमर बाजवा, आयएसआय प्रमुख जनरल नदीम अंजूम त्यात होते. दोघे इम्रान यांच्या बंगल्यातील लॉनमध्ये उतरले. इम्रान यांच्यासोबत तीन निकटवर्तीय होते. समोर दोन आणि आपण चार, हे पाहून इम्रान यांना जोर चढला. ते अद्वातद्वा बोलायला लागले. नदीम अंजुम यांना सहन झाले नाही आणि दिली त्यांनी सोडून… इम्रान सुन्‍न होते. तिघे निकटवर्तीय मागे सरकलेले होते. बराच वेळ इम्रान स्वत:चा गाल चोळत राहिले…'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news