

नवी दिल्ली : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-4 मध्ये भारतीय संघ पाकनंतर श्रीलंकेकडूनही पराभूत झाला. यामुळे टीम इंडिया फायनलच्या शर्यतीमधून बाहेर पडली. पाकच्या अफगाणिस्तानवरील विजयाने यावर शिक्कामोर्तबच झाले. भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडण्यास खालील काही प्रमुख कारणेच जबाबदार आहेत, असे म्हणावे लागेल.
आघाडी फळी ठरली अपयशी
अवघ्या अकरा महिन्यांपूर्वी संयुक्त अरब अमिरातमध्येच झालेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत केलेल्या चुकांमधून भारतीय संघाने काहीच बोध घेतला नाही. या स्पर्धेत आघाडीची फळी अपयशी ठरली आणि भारताच्या आशेवर पाणी फिरले. आशिया चषक स्पर्धेतही याच टॉप ऑर्डरसोबत भारतीय संघ उतरला. सर्व सामन्यांत राहुल आणि रोहित सलामीला आले. तर तिसर्या क्रमांकावर कोहली आला. राहुलने चार सामन्यांत अवघ्या 70 धावांचे योगदान दिले. तर कोहलीने 154 धावा काढल्या, पण त्याचा स्ट्राईक रेट 122.22 इतका कमी राहिला, तर रोहित शर्माने आक्रमक फटकेबाजी केली; मात्र तीन सामन्यांत चांगली सुरुवात मिळूनही त्याला मोठी खेळी करता आली नाही.
वेग नसलेले वेगवान आक्रमण
ज्या गोलंदाजांचा वेग ताशी 140 किमीपेक्षा जास्त होता, ते दुबईच्या खेळपट्टीवर जास्त प्रभावी ठरले. पाक आणि श्रीलंकन संघात असे अनेक गोलंदाज होते की ते इतक्या वेगाने गोलंदाजी करत होते. भारतीय संघातील बहुतेक गोलंदाज ताशी 120 ते 130 किमी वेगाने गोलंदाजी करत होते. यामुळेच त्यांची गोलंदाजी म्हणावी तितकी प्रभावी ठरू शकली नाही. याशिवाय पाकविरुद्धच्या सलामी सामन्याचा अपवाद वगळता अन्य लढतींमध्ये ठराविक अंतराने संघाला विकेट मिळवून देण्यात अपयशी ठरले.
संघात सातत्याने बदल
भारताने गेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर या छोट्या प्रारूपात तब्बल 28 खेळाडूंना अंतिम अकरांमध्ये स्थान दिले. यातील एकही खेळाडू जम बसवू शकला नाही. कोणत्याही एखाद्या खेळाडूला एकाच स्थानावर जास्त सामन्यांत फलंदाजी करण्याचा अनुभव मिळाला नाही. याउलट पाक व श्रीलंकेने बहुतेक सामन्यात एकच कॉम्बिनेशन कायम ठेवण्यास प्राधान्य दिले. यादरम्यान पाकने 22 तर श्रीलंकेने 19 खेळाडूंची चाचपणी केली.
खेळाडू कमी, कर्णधार जादा
भारताने गेल्या वर्षभरात तब्बल 8 खेळाडूंना कर्णधारपदाची संधी दिली. ही एक नवा कर्णधार तयार करण्याची प्रक्रिया ठरू शकते; मात्र ही प्रक्रिया संघासाठी प्रभावी ठरू शकली नाही. सध्याच्या संघात ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रोहित शर्मा हे तीन कर्णधार सहभागी आहेत.
खराब संघ निवड
आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांना घेऊन गेली आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या रूपात चौथा वेगवान गोलंदाज होता. जोपर्यंत आवेश खान तंदुरुस्त होता, तोपर्यंत सर्वकाही सुरळीत होते. मात्र, आवेश आजारी पडला आणि संघाचे संतुलन पूर्णत: बिघडले. आवेशच्या स्थानी खेळणारा कोणताही खेळाडू उपलब्ध नव्हता.