आयएनएस विक्रांत : स्टेट ऑफ द आर्ट

आयएनएस विक्रांत : स्टेट ऑफ द आर्ट
Published on
Updated on

आयएनएस विक्रांत या स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका भारताची पहिली स्टेट ऑफ द आर्ट विमानवाहू युद्धनौका आहे. हिंदी महासागरात चीनचा हस्तक्षेप वाढत असताना ही भारतीय नौदलाची शक्‍ती वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे सामरिक अस्त्र ठरणार आहे.

आयएनएस विक्रांत या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेला चाचणीसाठी अलीकडेच समुद्रात उतरवण्यात आले. विक्रांतची बांधणी कोचिनमध्ये झाली. ही युद्धनौका 75 टक्के स्वदेशी उपकरणे आणि साहित्य वापरून साकारली आहे. पन्‍नास वर्षांपूर्वी 1971 मध्ये पाकिस्तानशी लढलेल्या युद्धात याच नावाने जुन्या युद्धनौकेने महत्त्वाची भूमिका बजावली. आता तेच नाव देऊन ही युद्धनौका आणखी सक्षम आणि भक्‍कम करण्यात आली आहे.

जलावतरण झाल्यानंतर पुढील सहा महिने या नौकेची चाचणी विविध ठिकाणी केली जाईल. या चाचणीत यशस्वी झाल्यानंतर विक्रांतला नौदलात सामील केले जाईल. त्यानंतर आयएनएस विक्रांत रशियाच्या सहकार्याने तयार केलेल्या आयएनएस विक्रमादित्यबरोबर युद्धसरावात सहभागी होईल.

आयएनएस विक्रांत ही भारताची पहिली स्टेट ऑफ द आर्ट विमानवाहू युद्धनौका आहे. ही नौका तयार करण्यासाठी भारताला तब्बल 23 हजार कोटींचा खर्च आला. या युद्धनौकेची निर्मिती करताना कोचिन शिपयार्डबरोबरच 550 भारतीय कंपन्यांची मदत झाली आहे. याशिवाय 100 एमएसएमई कंपन्यादेखील सहभागी आहेत. या युद्धनौकेचेे सुटे भाग वेगवेगळ्या कंपनीने तयार केले. हे 'मेक इन इंडिया'चे आदर्श उदाहरण आहे. यावर तैनात होणार्‍या लढाऊ विमानांचा देखील खूप विचार केला आहे. सुरुवातीला हलक्या वजनाचे 'तेजस' उतरवण्याचा विचार केला. परंतु, हा निर्णय कॅरियरच्या हिशेबाने वजनदार ठरत होता. यावर डीआरडीओनेे एक योजना आखली आणि ती 'एचएएल'ला दिली. आता ट्विन इंजिन डेक बेस्ड फायटर विमान विकसित केले जात आहे. तोपर्यंत यावर मिग-29 श्रेणीतील लढाऊ विमाने तैनात केली जातील.

भिलाई येथील कारखान्यातील भक्‍कम पोलादातून युद्धनौकेची बांधणी झाली. यासाठी विशेष दर्जाची प्लेट निर्माण करण्यात आली आहे. यापूर्वी ही प्लेट रशियातून मागवली जात असे.

भिलाईमध्ये तयार झालेल्या प्लेटमधून साकारलेले जहाज समुद्रातील खोलपणा मोजेल आणि शत्रूंच्या ठिकर्‍या उडवेल. या युद्धनौकेचा फ्लाईट डेक अजस्र आहे. तो 1.10 लाख चौरस फूट आकाराचा आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने विमान उतरतील आणि भरारी घेतील. याप्रमाणे एकाचवेळी 36 ते 40 लढाऊ विमान तैनात करता येतील. आताच्या योजेननुसार यावर मिग-29 चे 26, कामोव्ह केए-31 श्रेणीतील दहा विमान, वेस्टलँड सी किंग किंवा बहुउद्देशीय भूमिका बजावणार धु्रव हेलिकॉप्टर तैनात करण्यात येतील. नौदलाच्या या युद्धनौकेची मारक क्षमता 1500 किलोमीटरपर्यंत आहे. यावर जमिनीतून हवेत मारा करणारी सक्षम 64 बराक क्षेपणास्त्र तैनात असतील. आयएनएस विक्रांतमध्ये जनरल इलेक्ट्रिकचे शक्‍तीशाली टर्बाईन असून ते 1.10 लाख हॉर्सपॉवरची शक्‍ती प्रदान करतील. त्यामुळे विक्रांत ही शक्‍तीशाली युद्धनौका म्हणून ओळखली जाईल.

विमानवाहू युद्धनौकेत स्वयंचलित मशिन, मार्गदर्शिका आणि संरक्षण प्रणाली सुसज्ज असेल. जहाजाची लांबी 860 फूट आणि खोली 84 फूट आहे, तर रुंदी 203 फूट आहे. या विमाननौकेचे एकूण क्षेत्रफळ अडीच एकर आहे. विक्रांत 52 किलोमीटर प्रतितास वेगाने समुद्राच्या लाटा भेदत आगेकूच करेल. समुद्रात उतरल्यानंतर ती एका दमात 15000 किलोमीटरपर्यंतचा प्रवास पार करू शकते. यात मोठ्या संख्येने नौदलाचे जवान तैनात करता येतील. सुमारे 196 नौदल अधिकारी, 1149 खलाशी आणि एअर क्रू राहू शकतील. जहाजावर चार आटोब्रेडा 76 मिलिमीटरची ड्यूअल पर्पज कॅनन असतील. याशिवाय चार एके 630 पॉईंट डिफेन्स सिस्टिमची गन असेल. एकंदरीत हिंदी महासागरात चीनचा हस्तक्षेप वाढत असताना आयएनएस विक्रांत ही भारतीय नौदलाची शक्‍ती वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे सामरिक अस्त्र ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news