

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीनंतर ईडीचा ससेमिरा पाठी लागल्याने वादाच्या भोवर्यात अडकलेल्या शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा देण्यास गुरुवारी नकार दिला.
न्यायमूर्ती एस.एस.शिंदे आणि न्यायमूर्ती एन.जे.जमादार यांच्या खंडपीठाने रुग्णालयात दाखल असलेल्या अडसूळ यांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश देताना याचिकेची सुनावणी 1 ऑक्टोबर रोजी निश्चित केली.
माजी खासदार आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत सुमारे 900 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार आमदार रवी राणा यांनी केली. त्यानंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. ईडीच्या अधिकार्यांनी 27 सप्टेंबरला सकाळी अडसूळ यांच्या राहत्या घरी आणि कार्यालयावर धाडी टाकल्या.
ईडीच्या कारवाईविरोधात अडसूळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली. यावेळी अडसूळ यांच्या वतीने अॅड. अभिनव चंद्रचूड यांनी बाजू मांडताना सिटी बँकेच्या 900 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराशी अडसूळ यांचा कसलाही संबंध नाही. केवळ आमदार राणा यांच्या विरोधात अडसूळ यांनी जातपडताळणी प्रमाणपत्राची तक्रार केल्यानेच सूडबुध्दीने खोटी तक्रार करण्यात आली आहे, असा आरोप केला.
अडसूळ यांना ईडीच्या कारवाईपासून तूर्तास दिलासा द्यावा, अशी विनंती केली, तर ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी याचिकेलाच जोरदार विरोध केला. बँकेच्या गैरव्यवहारासंबंधी तक्रार आल्यानंतर ईडीने चौकशी सुरू केली आहे. या चौकशीचा निवडणूकप्रकरणी अडसूळ यांनी केल्या तक्रारीचा काही संबंध नसल्याचा दावा केला.
आनंदराव अडसूळ यांना गुरुवारी उपचारांसाठी दुसर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अडसूळ यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून गोरेगावच्या लाईफलाईन रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना दुसर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथेही ईडीचे अधिकारी तैनात ठेवण्यात आले आहेत.