आद्य गुरुरूप…भगवान दत्तात्रेय

आद्य गुरुरूप…भगवान दत्तात्रेय
Published on
Updated on

आज श्री दत्तजयंती. त्यानिमित्ताने…

भारतीय संस्कृतीमध्ये सद्गुरूंचे स्थान अनन्यसाधारण असेच आहे. तैत्तिरीय उपनिषदात 'आचार्य देवो भव' अशा शब्दांमधून सद्गुरूंना देव मानण्याचा उपदेश केलेला आहे. भगवद्गीतेतही तत्त्वदर्शी गुरूंकडे जाऊन ज्ञान घेण्याचा उपदेश भगवान श्रीकृष्णांनी केलेला आहे. सद्गुरूंना परब्रह्म मानले जातेच; पण साक्षात परब्रह्मच सद्गुरूची भूमिका घेऊन अवतरत असेल तर त्याला एक विशेष महत्त्व आहे. भगवान श्रीदत्तात्रेयांचा अवतारही असाच आहे.

संपूर्ण चराचराला व्यापून राहिलेले परब्रह्म जगाला ज्ञानदान करण्यासाठी श्रीदत्तगुरूंच्या रूपात अवतरले. हा अवतार खास ज्ञानदानासाठी व भक्तांचा भवसागरातून उद्धार करण्यासाठीच असल्याने त्याचे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे. या अवताराला आपण 'श्री गुरुदेव दत्त' असेच संबोधतो, हे विशेष! सर्व गुरूंचेही गुरू असलेल्या या आदिगुरू किंवा परमगुरू अशा दत्तात्रेयांची आज जयंती. ही जयंती सद्गुरूंचे महत्त्व जसे ठसवणारी आहे, तसेच कोणत्याही प्रकारच्या भेदांना झिडकारून अभेदाचे तत्त्व शिकवणारी, समन्वय व सौहार्द साधणारीही आहे.

'या विश्वाचा जो कुणी स्वामी, परमेश्वर असेल त्याने मला दर्शन द्यावे,' अशा हेतूने अत्री ऋषींनी तपस्या केली होती. अत्री हे एक वेदमंत्रद्रष्टे ऋषी होते व सप्तर्षींमध्येही त्यांचा समावेश होतो. त्यांच्या तपस्येवर प्रसन्न होऊन सृष्टीनाथ (ब्रह्मदेव), जगन्नाथ (विष्णू) आणि विश्वनाथ (शंकर) असे तीनही देव त्यांच्यासमोर प्रकट झाले. 'सृष्टी', 'जग' आणि 'विश्व' या शब्दांचे अर्थ एकच आहेत, हे आपण जाणतोच. जर हे एकच असेल तर त्याचा 'नाथ'ही एकच असणार, त्यामध्ये भेद असणार नाही, हेही स्पष्टच आहे! त्यावरूनच हे समजते की, नाम आणि रूप वेगवेगळे असले तरी या तिन्ही दैवतांमध्ये तत्त्वतः ऐक्यच आहे. सत्त्व, रज व तम या प्रकृतीच्या तीन गुणांनुसार तसेच सृष्टीची निर्मिती, पालन व लय या तीन कार्यांनुसारच त्यांच्यामध्ये केवळ बाह्य भेद आहेत.

अत्री ऋषींना त्यांच्यामधील अभेद समजले होते व म्हणूनच त्यांचे 'अ-त्री' म्हणजे 'तीन नसून एकच' हे नाव सार्थ झाले. त्यांची पत्नी अनसुया ही कर्दम ऋषी व देवहुती यांच्यासारख्या तपःपुत दाम्पत्याची कन्या. तिचा भाऊ म्हणजे ज्यांना भगवंताचा एक अवतार मानले जाते ते कपिल मुनी. अनसुयाही महान तपस्विनी आणि पतिव्रता होती. वनवासाच्या काळात भगवान श्रीराम, लक्ष्मण व सीता हे अत्री व अनसुया यांच्या आश्रमात गेल्यावर अनसुयेने सीतेलाही पतिव्रता धर्माचा उपदेश केला होता, तसेच विशेष अंगराग भेट म्हणून दिला होता. 'असुयारहित' अशी पवित्र बुद्धी असलेल्या अनसुया आणि 'अ-त्री' भावना असलेले अत्री ऋषी अशा दाम्पत्याच्या पोटी तिन्ही देवतांचे एकत्रित रूप असलेल्या दत्तगुरूंचा मार्गशीर्ष पौर्णिमेला अवतार झाला.

हा अवतार कृतयुगात म्हणजे सत्ययुगात झाला असला तरी ते सर्व युगांमध्ये विद्यमान असल्याचे मानले जाते. याचा अर्थ ज्ञान व ज्ञानदाता यांचे अस्तित्व अखंडितच राहते. तत्त्वतः गुरुतत्त्व हे अजरामर व अखंडितच आहे. स्वतः दत्तगुरूंनी चोवीस गुरू केले होते, असे 'यदू-अवधूत' संवादातून समजते. 'जिथे चांगला गुण दिसेल तेथून तो आत्मसात करावा,' हा उपदेश यामधून मिळतो. दत्तगुरूंच्या शिष्यांमध्येही मोठीच विविधता आहे.अनेक संप्रदायांच्या आद्य गुरूंनाही भगवान दत्तात्रेयांचा अनुग्रह लाभलेला आहे. त्यामध्ये आखाडा परंपरेचे जनक असलेल्या श्री रत्नयती यांच्यापासून ते पाच हजार वर्षांपासून चालत आलेल्या आनंद संप्रदायाच्या आनंद, सदानंद व हरिपादानंद यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश होतो.

दत्तात्रेयांचे योगीराज, अत्रिवरद यांसारखे सोळा अवतार मानण्याची परंपरा आहे. कलियुगातील अनेक सत्पुरुषांनाही त्यांचे अवतार मानले जाते. त्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, अक्कलकोट स्वामी, माणिकप्रभू, श्रीकृष्ण सरस्वती, गजानन महाराज, वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी), साईबाबा, गणेशपुरीचे श्रीनित्यानंद यांसारख्या महान सत्पुरुषांचा समावेश होतो. श्रीदत्तगुरू हा ज्ञानावतार आहे आणि सर्व जाती, संप्रदाय, पंथ व धर्मांतील लोकांमध्ये समन्वय साधणारा 'समन्वयात्मक अवतार'ही आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त या आद्य गुरुरूपास शतशः वंदन!

– सचिन बनछोडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news