

भोपाळ ; वृत्तसंस्था : कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांना काळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याची उदाहरणे मध्यंतरी मोठ्या प्रमाणात समोर आली. मात्र आता डेंग्यू झालेल्यांनाही ब्लॅक फंगसचा धोका असल्याचे निष्पन्न झाले आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये अशा प्रकारचा पहिलाच रुग्ण आढळून आला आहे.
एका 40 वर्षीय व्यक्तीला डेंग्यू झाल्यानंतर त्याने सुरुवातीला नजीकच्या डॉक्टरकडून उपचार घेतले. मात्र नंतर त्याचे डोळे लालसर झाले. नेत्रतज्ज्ञांनाही याचे नेमके कारण सापडले नाही. त्याच्या डोळ्यांखालील जागेत पस तयार झाला आहे. या रुग्णाला जबलपूर वैद्यकीय विद्यालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. तेथे त्याच्यावर उपचार सुरू झाल्यानंतर त्याच्या प्लेटलेट्समध्ये चांगली वाढ झाली.
काळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याने आता त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल, अशी माहिती जबलपूर वैद्यकीय विद्यालयातील ईएनटी विभागाच्या प्रमुख कविता सचदेव यांनी दिली. एका डेंग्यू झालेल्या रुग्णाला काळ्या बुरशीचा संसर्ग होणे, ही धक्कादायक बाब असून त्याला कोरोना झालेला नव्हता. तसेच मधुमेहही नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या रुग्णाने अगोदर उपचार घेतलेल्या डॉक्टरकडून त्याला काही अशी औषधे देण्यात आली असावीत, त्यामुळे हा संसर्ग झाला, अथवा डेंग्यूपूर्वी त्याला कोरोनाचा संसर्ग झाला असेल आणि ते त्याला कळलेही नसेल, अशी शक्यताही डॉक्टरांनी व्यक्त केली.