

शिलाँग : परदेशातून आलेले आणि भारतीयांच्या जीभेवर ठाण मांडून बसलेले अनेक पदार्थ आहेत. त्यामध्ये अगदी समोशापासून पिझ्झापर्यंत अनेक पदार्थांचा समावेश होतो. 'समोसा' म्हटलं की हा एक भारतीय पदार्थ आहे असे आज देश-विदेशातील अनेकांना वाटत असले तरी मुळात या पदार्थाचा जन्म इराणमध्ये झाला होता व तेथून ही पाककृती भारतात आली व रुळली.
आता असाच एक परदेशातून आलेला पदार्थ भारतीयांच्या आहारात रुळत आहे. हा पदार्थ म्हणजे मोमो. आपल्या मोदकासारखाच दिसणारा आणि तसाच सारण भरून, उकडून तयार केला जाणारा हा पदार्थ आहे. मात्र, तो गोड नसून तिखट असतो व बहुतांशी शाकाहारी नसून मांसाहारी असतो हा फरक!
सध्या अनेक गावं आणि शहरांमध्ये मोमोज मिळतात. मात्र, मुळात हा पदार्थ एका चिनी समुदायाने मेघालयाची राजधानी शिलाँगमध्ये आणला आणि लोकप्रिय केला. चीनमधून आलेले हे लोक शिलाँगमध्ये स्थायिक झाले आणि त्यांनी चायनीज फूडचा व्यवसाय सुरू केला. यामध्ये मोमोजचाही समावेश होता. चीनमध्ये किंवा तिबेटमध्ये मोमोजला 'डिमसम' किंवा 'डंपलिंग' असे म्हणतात. तिथे ते मांसाचे सारण भरून बनवले जाते. त्याबरोबरच काही हिरव्या पालेभाज्याही असतात.
मोमोज हे अरुणाचल प्रदेशातील मोनपा आणि शेरदुकपेन समुदायाच्या लोकांच्या आहाराचाही एक भाग आहेत. तिबेट आणि नेपाळमधील ती अतिशय लोकप्रिय पारंपरिक डिश आहे. ईशान्य भारत व नेपाळमधील डोंगराळ भागात मोमोज अतिशय आवडीने खाल्ले जातात. त्यामध्ये मोहरीची पाने आणि अन्य भाज्यांचे सारण भरतात.
सर्वात स्वादिष्ट मोमोज शिलाँगमध्येच मिळतात असे म्हटले जाते. हे मांसाहारी मोमोज गरमागरम मिरच्यांसमवेत खाण्यास दिले जातात. त्याबरोबर मसालेदार चटणीही असते. तिबेटी लोक त्यांच्या देशातून परागंदा होऊन भारतात आल्यावर त्यांच्यामुळे भारतातही मोमोज लोकप्रिय झाले. सध्या अनेक प्रकारचे मोमोज बनवले जातात. अगदी चॉकलेट मोमोही बनवले जातात!