

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवार (दि. 14) मार्च पासून राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचारी – शिक्षक बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी व निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी ही माहिती दिली.
गेल्या आठवड्यात मुंबईत निमसरकारी, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या घटक संघटनांच्या पदाधिकार्यांची बैठक झाली. राज्य सरकारने कर्मचारी शिक्षकांच्या रास्त मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याच्या भावना कर्मचार्यांकडून होत आहेत.
जुन्या पेन्शन योजनेची पुनर्स्थापना करा या मागणीासाठी राज्य सरकारने संदिग्ध भूमिका घेतली असल्याचे कर्मचारी-शिक्षकांचे म्हणणे आहे. राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड या राज्यांनी तेथील कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली आहे. राज्याच्या अर्थभाराचे सुयोग्य नियोजन केल्यास जुनी पेन्शन करणे शक्य आहे हे या राज्यांनी दाखवून दिले आहे.