आ. हसन मुश्रीफ- समरजित घाटगे यांच्यातील संघर्ष टोकाला

आ. हसन मुश्रीफ- समरजित घाटगे यांच्यातील संघर्ष टोकाला
Published on
Updated on

कोल्हापूर : विकास कांबळे : कागलमधील राजकारण नेहमीच तापलेले असते. आ. हसन मुश्रीफ व समरजित घाटगे गटातील संघर्ष आता संपूर्ण जिल्ह्यात गाजू लागला आहे. आ. मुश्रीफ यांच्या चालीवर लक्ष ठेवत गेल्या पाच वर्षांपासून समरजित घाटगे त्यांना शह देण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून आरोप, प्रत्यारोप सुरूच असतात. परंतु, जिल्हा बँकेच्या कारभारात घाटगे यांनी लक्ष घातल्यामुळे आ. हसन मुश्रीफ व राजकारणाच्या आखाड्यात सर्व तयारीने उतरलेले घाटगे यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेला आहे. या नव्या संघर्षाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

राजकीय विद्यापीठ म्हणून कागल ओळखले जाते. या तालुक्यातील शामराव भिवाजी पाटील, दौलतराव निकम, सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे, हसन मुश्रीफ, संजय घाटगे यांच्याभोवती या मतदार संघातील राजकारण फिरत राहिले. पक्षापेक्षा गटा-तटाच्या राजकारणाला अधिक महत्त्व आहे. सध्या कागलमध्ये मुश्रीफ, मंडलिक, संजय घाटगे आणि समरजित घाटगे यांचे गट प्रबळ आहेत.
सदाशिवराव मंडलिक व हसन मुश्रीफ यांच्यातील वाद संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात गाजला. त्यानंतर मंडलिक यांच्यापासून मुश्रीफ यांनी फारकत घेत आपली स्वतंत्र वाटचाल सुरू ठेवली. यामध्ये शरद पवार यांनी त्यांना ताकद दिली. त्यामुळे मुश्रीफ यांनी तालुक्यात नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणात स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. मंडलिक व मुश्रीफ यांच्या वादाचे मुख्य कारण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे राजकारण होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष कै. नरसिंग गुरुनाथ पाटील यांना करावयाचे होते; परंतु मुश्रीफ यांनी त्याला विरोध केला व स्वतः बँकेचे अध्यक्ष झाले आणि येथून मंडलिक व मुश्रीफ संघर्ष सुरू झाला. त्याच कारणावरून आता मुश्रीफ व समरजित घाटगे यांच्यातील राजकीय संघर्ष आता टोकाला गेला आहे. विधानसभेची निवडणूक झाली की मुश्रीफ यांच्या विरोधी गटाच्या नेत्यांच्या हालचाली मंदावत असत. मुश्रीफ मात्र सतत लोकांमध्ये मिसळत राहतात. सकाळपासून त्यांचा दरबार सुरू होतो. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क कायम असतो. राज्य पातळीवरील नेत्यांचे वर्षातून तीन, चार कार्यक्रम ते घेतात. त्यामुळे सतत ते निवडून येत आहेत. विरोधी गटात मात्र निवडणुका येईपर्यंत शांतता असते. त्याला समरजित घाटगे मात्र अपवाद ठरले.

विक्रमसिंह घाटगे असेपर्यंत समरजितसिंह राजकारणात कधीही दिसले नाहीत. परंतु, विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनानंतर ते सक्रिय झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत समरजित घाटगे थेट मुश्रीफ यांच्या विरोधात अपक्ष म्हणून मैदानात उतरले. त्यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात चांगली मुसंडी मारत ८८ हजार मते घेतली. संजय घाटगे यांना ५५ हजार मते पडली.

पराभवानंतर घरात न बसता समरजित घाटगे दुसऱ्या दिवसापासून पुन्हा कामाला लागले. भाजपच्या मदतीने मुश्रीफ गटासमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. मुश्रीफ जे कार्यक्रम करतील तसे कार्यकम घाटगे आपल्या मतदारसंघात राज्य पातळीवरील भाजपचे नेते बोलावून करू लागले. मुश्रीफ जे आरोप करतील त्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर देऊ लागले. गावागावांत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत ते जाऊ लागले. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून ते सतत चर्चेत राहिले. स्थानिक पातळीवरील निवडणुकीच्या निमित्ताने घाटगे आपल्या गटाची ताकद वाढवू लागले. मुश्रीफांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न ते करू लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news