

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या महिनाभरापासून माझ्यावर गुन्हे दाखल करायचे षड्यंत्र सुरू होते. कोणताच गुन्हा दाखल करता येत नाही म्हणून राजकीय दबावतंत्र वापरून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझ्या विरोधात आजपर्यंत अनेक षड्यंत्रे रचली गेली. आता नव्याने पुन्हा सुरुवात झाली आहे. या लढाईचा शेवट होईपर्यंत माझ्याबद्दल षड्यंत्र रचणार्यांच्या विरोधात किती एफआयआर दाखल होतील, हे येणारा काळच ठरवेल, असा इशारा आ. जयकुमार गोरे यांनी दिला.
दहीवडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना आ. गोरे म्हणाले, माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यातील तक्रारदार कोण आहे, हे मला माहीत नाही. छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या जागेसंदर्भातील एनए प्रकरणी घेतलेल्या संमती पत्राचा विषय आहे. संबंधित व्यक्तीला त्यांची जमीन बळकावण्यात आली आहे, तुमच्या जमिनीवर बुलडोझर फिरवला जाणार आहे अशी धमकी देण्यात आली. त्या व्यक्तीला गुमराह करुन माझ्या विरोधात गुन्हा दाखल करायला भाग पाडले आहे. त्यासाठी वापरलेले अॅफेडेव्हिट बोगस आहे. त्यावरील फक्त फोटो माझा आहे.
माझी सही आणि अंगठा बोगस आहे. एका लोकप्रतिनिधीचे अॅफेडेव्हिट तो हजर नसताना तयार करणार्या अधिकार्यावर मी फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. पोलिसांनी माझा आधार कार्डशी लिंक असणारा अंगठा आणि अॅफेडेव्हिटवरील बोगस अंगठा तसेच सही व्हेरिफाय करण्याची गरज आहे, असेही आ. जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे.
माझ्यावर राजकीय दबाव वापरुन गुन्हे दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील काही महाभाग रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. आता पुन्हा सुरुवात झाली आहे. शेवट होईपर्यंत मी पण थांबणार नाही. किती एफआयआर दाखल होतील हे येणारा काळच ठरवेल. बोगस गुणपत्रिका, दाखले तयार करुन बोगस डॉक्टर्स तयार करण्याचा कारखाना मायणीत सुरु होता.
एक वर्षभर त्या विरोधात गुन्हा दाखल होत नव्हता. त्यासाठी मोठी राजकीय ताकद पणाला लावण्यात आली होती. आम्ही प्रयत्न केल्याने तो गुन्हा दाखल होताच माझ्या विरोधात षड्यंत्र रचले गेले आहे.
बोगस कागदपत्रांच्या आधारे बोगस डॉक्टर्स तयार करताना केलेला 125 कोटींचा घोटाळा, बोगस कर्ज प्रकरणे, बोगस बँक गॅरंटी, ट्रस्टचे बोगस धनादेश असे गुन्हे दाखल होवू नयेत म्हणून माझ्यावर दबाव टाकण्यासाठी असले उद्योग केले जात आहेत. लढाई सुरु झाली आहे. जयकुमार या लढाईतून मागे हटणार नाही असेही त्यांनी सांगितले.