असुरक्षित संबंधांमुळे 10 वर्षांत 17 लाख भारतीयांना एचआयव्ही

असुरक्षित संबंधांमुळे 10 वर्षांत 17 लाख भारतीयांना एचआयव्ही
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी डेस्क : दोन वर्षांत संपूर्ण जगात कोरोना विषाणूने हाहाकार उडवल्याच्या पार्श्‍वभूमीवर एड्सला (अ‍ॅक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम) कारणीभूत असलेला एचआयव्ही (ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस) काहीसा पडद्याआड गेला होता. मात्र, या असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे मागील 10 वर्षांत 17 लाखांहून अधिक भारतीयांना या विषाणूची बाधा झाल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकार अर्जाच्या उत्तरातून समोर आले आहे.

देशात 2011 ते 2021 या दशकात किती लोकांना एचआयव्हीची लागण झाली, याची माहिती मध्य प्रदेशातील आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेकडे (नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन-नॅको) मागितली होती. त्यावर, या 10 वर्षांत देशातील 17 लाख 8 हजार 777 व्यक्तींना असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे एचआयव्हीची बाधा झाल्याचे उत्तर नॅकोने दिले आहे. या उत्तरातील एक दिलासादायक बाब म्हणजे, ही संख्या 2011-12 मधील 2.4 लाख बाधितांवरून 2021-21 मध्ये 85 हजार 268 बाधितांपर्यंत कमी झाली आहे.

याच 10 वर्षांच्या काळात रक्तसंक्रमण आणि अन्य संबंधित माध्यमातून 15 हजार 782 व्यक्तींना एचआयव्हीची लागण झाली, तर माता-बालक माध्यमातून 4 हजार 423 जण बाधित झाले. दरम्यान, एचआयव्हीबाधितांच्या संख्येत घट होत असल्याची दिलासादायक माहिती नॅकोच्या उत्तरातून मिळाली आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून देशभरात 2020 मध्ये एचआयव्हीबाधितांची एकूण संख्या 23 लाख 18 हजार 737 होती; त्यांच्यात 81 हजार 430 बालकांचा समावेश होता.

दरम्यान, कोरोना महामारी आणि लॉकडाऊन निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांत देशात एचआयव्हीबाधेचे निदान होण्यात घट झाली आहे, याकडे नवी दिल्लीतील द्वारका येथील आकाश हेल्थकेअरच्या इंटर्नल मेडिसीन विभागातील वरिष्ठ चिकित्सक डॉ. प्रभात रंजन सिन्हा यांनी लक्ष वेधले. आता कोव्हिडचा प्रादुर्भाव ओसरत असल्यामुळे एचआयव्ही रुग्णांची संख्या वाढू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर

1. एड्सवर कोणताही कायमस्वरूपी उपचार नाही; मात्र योग्य वैद्यकीय उपचार घेतल्यास तीव्रता कमी होऊ शकते. गेल्या दोन दशकांत एचआयव्हीबाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचे गुरुग्राम येथील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या इंटर्नल मेडिसीन विभागाचे संचालक सतीश कौल यांनी सांगितले.

2. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनचे देशभरात चांगले जाळे आहे. या संस्थेतर्फे एचआयव्ही रुग्णांना निदानापासून 'हार्ट' (हायली अ‍ॅक्टिव्ह अँटी रिट्रोव्हायरल ट्रीटमेंट) उपचारांपर्यंत सेवा दिली जाते. वैद्यकीय उपचारांच्या उपलब्धतेमुळे गेल्या दोन दशकांत एचआयव्हीबाधितांना दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news