

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : येस बँक आणि दिवाण हौसिंग फायनान्स लि.च्या (डिएचएफएल) माध्यमातून करण्यात आलेल्या 3700 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि एबीआयएल ग्रुपचे सर्वेसर्वा अविनाश भोसले यांच्या कोठडीवरील निकाल विशेष सीबीआय न्यायालयाने 30 मे पर्यंत राखून ठेवला आहे. तोपर्यंत भोसले यांना नजर कैदेत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
डिएचएफएलचे प्रवर्तक कपील वाधवान आणि धीरज वाधवान यांनी येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांच्याशी संगनमताने कोट्यावधी रुपयांचा घोटाळ्यात अविनाश भोसले यांचा गुन्ह्यातील सहभाग समोर आला. त्यानंतर सीबीआयने गुरुवारी रात्री भोसले यांना ताब्यात घेत अटक केली.
सीबीआयने भोसले यांना शुक्रवारी दुपारी विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले. यावेळी सीबीआयच्या वतीने सरकारी वकिलांनी युक्तिवाद करत भोसले यांच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकिलांनी रीमांडला विरोध करत एक अर्ज दाखल केला.
न्यायालयाने या अर्जाला उत्तर देण्यासाठी सीबीआयला सोमवारपर्यंतची मुदत दिली आहे. 30 मे रोजी सकाळी 11 वाजता अविनाश भोसलेंना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्याचे निर्देश दिले. तोपर्यंत अविनाश भोसले यांना सीबीआयच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) विश्रामगृहात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर, पुढील दोन दिवस सायंकाळी 5 ते 6 दरम्यान भोसलेंना वकिलांना भेटू देण्याची परवानगीसुध्दा न्यायालयाने दिली आहे.
भोसले का अडकले?
* येस बँकेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांनी डीएचएफएल समुहाचे कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्याशी संगनमत करून केलेल्या तब्बल 3700 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील पैसा सीबीआय शोधते आहे. या रक्कमेचा शोध घेता घेता सीबीआयचे पथक बिल्डर अविनाश भोसले यांच्यापर्यंत पोहोचले.
* डीएचएफएल-दिवान फायनान्स लिमिटेड ही कंपनी दिवाळखोरीत असतानाही या कंपनीच्या अल्पमुदतीच्या कर्जरोख्यांमध्ये राणा कपूर यांनी येस बँकेचा हा पैसा गुंतवला. तो अजूनही परत केलेला नाही. या रकमेचा मोबदला म्हणून मग वाधवान बंधूंनी 600 कोटी रुपये राणांच्या मुली संचालक असलेल्या डु ईट अर्बन व्हेंचर्सकडे कर्ज म्हणून वळवले.
* बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, विनोद गोयंका, शाहिद बलवा, राजकुमार कंदस्वामी आणि सत्यान टंडन यांच्याशी संबंधित बांधकाम कंपन्यांनी येस बँकेच्या कर्जाचे पैसे लुटण्यासाठी वाधवान बंधूंना मदत केल्याचा सीबीआयला संशय आहे.
* येस बँकेने जून 2018 च्या पहिल्या आठवड्यात केलेल्या गुंतवणुकीनंतर डिएचएफएलने लगेचच बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रीया यांच्या रेडियस इस्टेट प्रोजेक्ट्स आणि सुमेर रेडियस रियल्टी यांना प्रत्येकी 1 हजार 100 कोटी आणि 900 कोटी रुपयांची कर्जे मंजूर केली. कपिल वाधवन यांनी रेडियस इस्टेट्स आणि डेव्हलपर्सना कोणतेही मूल्यांकन किंवा जोखीम मूल्यांकन न करता 416 कोटी रुपये वितरित केल्याचे सीबीआय तपासात समोर आले आहे.
* अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एबीआयएल) सह भोसलेंच्या कंपन्यांकडे संजय छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुप कन्सर्न्समधून 292.50 कोटी वळवले गेले.
* डिएचएफएलकडून एकूण 2 हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळाल्यानंतर, सुमेर रेडियस रियल्टी प्रा. लि. ने ही रक्कम भोसले यांच्या निबोध रियल्टी एलएलपी आणि एबीआयएल डेअरी या कंपन्यांमध्ये वळवली होती.
* भोसले यांच्या कंपन्यांनी 2018 मध्ये डिएचएफएलकडून तीन प्रकल्पांसाठी सल्लागार सेवांच्या नावाखाली 68.82 कोटी रुपये मिळवल्याचे सीबीआय तपासात उघड झाले आहे. प्रत्यक्षात अशी कोणतीही सेवा भोसलेंकडून प्रदान केली गेली नाही. रक्कम मात्र भोसलेंना मिळाली. याबाबत भोसले यांना समाधानकारक खुलासा करता आला नसल्याचे समजते.