अर्थकारण : शेअर बाजाराचा बादशाह
मोतीलाल ओसवाल
राकेश झुनझुनवाला आपल्यासाठी मोठा वारसा मागे ठेवून गेले आहेत. राकेश यांनी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा लोकोपयोगी कामांसाठी दिला. त्यांचा द़ृष्टिकोन नेहमीच सकारात्मक होता. 'भारताला खूप चांगले भवितव्य आहे. येत्या दहा-वीस वर्षांत देश खूप प्रगती करेल!' असे ते नेहमी म्हणायचे.
राकेश झुनझुनवाला हे केवळ शेअर बाजाराचे राजा नव्हते, तर ते बिगेस्ट बुल, भारताचे सर्वात मोठे वकील आणि एक अतिशय चांगले गृहस्थ होते. शेअर बाजाराला वेगळी उंची देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांना शेअर बाजारात अनेक लोक भेटायला येत होते. वेल्थ क्रिएशनचे ते उत्तम उदाहरण होते. त्यांनी केवळ स्वतः पैसा कमावला नाही, तर इतरांनाही कमवायला प्रोत्साहित केले. राकेश झुनझुनवाला यांना गेल्या 35 वर्षांपासून मी ओळखत होतो. माझी आणि त्यांची कारकीर्द जवळपास एकाच वेळी सुरू झाली. मीपण सीए (चार्टर्ड अकौंटंट) केले आणि त्यांनीही केले होते. त्याकाळी भारतात केवळ एकच मोठा शेअर बाजार होता – बाँबे स्टॉक एक्स्चेंज. त्यात एक ट्रेडिंग हॉल होता. त्याला आम्ही ट्रेडिंग रिंग म्हणत असू. तिथे आम्ही रोज भेटायचो.
राकेश यांच्या आजूबाजूला सुरुवातीपासूनच लोक असायचे कारण त्यांच्याकडे विश्वास होता. त्या विश्वासाला ज्ञानाचा आधार होता. त्यामुळे लोक त्यांचा खूप आदर करत. राकेश यांची खास गोष्ट म्हणजे ते नेहमी मनापासून बोलत असत. त्यांनी कधीही काहीही लपवले नाही. सहसा लोक जेव्हा काही स्टॉक आदी विकत घेतात तेव्हा ते त्याबाबत इतरांना सांगत नाहीत. परंतु राकेश तसे नव्हते. ते मनाने खूप मोकळे होते. त्यांच्यात अजिबात बनावटीपणा नव्हता. प्रत्येकाला शेअर बाजारातून पैसा मिळाला पाहिजे, अशी त्यांची धारणा होती.
स्टॉक रिंगमध्ये जर आम्ही भेटू शकलो नाही, तर खाली दलाल स्ट्रीटवर भेटत होतो. अनेक वेळा राकेश ऑफिसमध्येही यायचे. त्यावेळी तेथे फक्त स्टॉक्सची चर्चा होत असे, आणखी काहीही होत नसे. आपण जिथे भेटतो तिथे 'हाय-हॅलो'ऐवजी एकच प्रश्न असायचा, मार्केटची स्थिती काय आहे? मग त्यावरून अनेक गोष्टी निघत. काय चांगले आहे, काय वाईट आहे यावर चर्चा होई. त्यांचा द़ृष्टिकोन नेहमीच सकारात्मक होता. ते जे काही बोलायचे, ते त्यांच्या ज्ञानाच्या आधारे लोकांना चांगले समजावून सांगायचे.
राकेश हे असे व्यक्ती होते, ज्यांच्याकडे दुर्मीळ कौशल्य होते. ते माणूस म्हणूनही दुर्मीळ होते. कंपनी, बाजार आणि अर्थव्यवस्था समजून घेणे आणि नंतर सर्व गोष्टींचा एकत्रितपणे विचार करणे. त्यानंतर कोणत्या कंपनीने शेअर कोणत्या किमतीला, केव्हा विकत घ्यायचे, हे ते ठरवीत असत. हे कौशल्य खूपच कमी लोकांकडे असते. सहसा तेथे जो विश्लेषक असतो, त्याला कंपनीबद्दल माहिती असते; पण तो शेअर बाजाराचे विश्लेषण करू शकत नाही. बाजार कुठे, कधी, कसा आणि का जाईल याची त्याला कल्पनाच नसते किंवा त्याचा अर्थव्यवस्थेशीही काही संबंध आलेला नसतो. त्या पार्श्वभूमीवर राकेश यांची ओळख वेगळीच होती.
राकेश यांची समज एवढी जबरदस्त होती की, ते सगळ्यांना मोकळेपणाने सांगू शकत असत की, आज मी हा शेअर घेतला, तुम्हीही घ्या. 1991-92 नंतर अनेक फंड गुंतवणूकदार भारतात आले. राकेश झुनझुनवाला हे एक प्रकारे त्यांचे सल्लागारही होते. जर तुम्हाला ते आवडत नसतील, तरीही तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाही. ते खोलीत बसून पुढे काय होणार आहे, याचा खूप विचार करीत असत. मग खूप संशोधन करीत. लोकांचे म्हणणे ऐकून घेण्याची त्यांची क्षमताही चांगली होती. त्यांना माहीत होते की, तुम्ही ऐकाल तरच तुम्हाला त्या विषयाची माहिती मिळेल. मग त्याच बांधिलकीने आणि तळमळीने ते शेअर खरेदी करीत असत.
मी जेव्हा कधी राकेश यांना भेटायचो तेव्हा विचारायचो, 'राकेश, काय वाटतंय..?' ते म्हणायचे, 'तेजी, तेजी, तेजी..!' म्हणायचे, 'घर विकून शेअर घ्या, बंगला विकून शेअर घ्या. पण शेअर कधीच विकू नका.' साधारणपणे शेअर बाजारात बोलायचे झाले, तर तेजी ही कायमच असते. मंदी ही तात्पुरती असते. त्यामुळे राकेशही नेहमी म्हणत असत की, एखादी व्यक्ती गतीने भरपूर पैसे कमवू शकते. त्यांनी आणि त्यांच्याशी संबंधित इतरांनीही पैसे कमावले. अनेक किरकोळ गुंतवणूकदार, अनेक नवीन लोक त्यांच्या मागून शेअर बाजारात आले. राकेश हे करू शकतात, तर आपण का नाही करू शकत! या धारणेने त्यांनी शेअर बाजारात प्रवेश केला.
राकेश स्वतः मार्केट मूव्हर होते. त्यांनी जर स्टॉक विकत घेतला असेल, तर तो आपोआप वाढायचा. लोकांचाही त्यांच्यावर एक प्रकारचा विश्वास होता. पण या विश्वासामागे त्यांचे संशोधन, बांधिलकी आणि समज होती. त्यातून अनेकांनी भरपूर पैसा कमावला. शेअर बाजारातील संपत्ती निर्मितीचा सम्राट म्हणून कुणाला संबोधायचे झाल्यास, मी 'राकेश झुनझुनवाला' यांचे नाव घेईन. देशासाठी ते खूप आशावादी होते. 'भारताला खूप चांगले भवितव्य आहे. येत्या दहा-वीस वर्षांत देश खूप प्रगती करेल!' असे ते नेहमी म्हणायचे. ते हळुवारपणे आणि स्पष्टपणे बोलत असत. परंतु त्यांच्या बोलण्याबद्दल कुणालाही कधी वाईट वाटले नाही. लोकांना कधी कधी वाटायचे की, ते थोडे उग्र बोलत आहेत. पण त्यांची स्वतःची जी आवड होती, ती लोकांशी शेअर करण्याची त्यांची स्वतःची पद्धत होती. ते मनापासून बोलत असत. त्यामुळे लोकांच्या हृदयावर ते राज्य करायचे.
राकेश आम्हा सर्वांना बरेच काही शिकवून गेले आहेत. आपल्यासाठी मोठा वारसा मागे ठेवून गेले आहेत. स्टॉक एक्स्चेंज ही अशी जागा आहे, जिथे आपण बरेच काही शिकू शकतो. कमवू शकतो आणि परतावा मिळवू शकतो. परंतु राकेश यांनी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा लोकोपयोगी कामांसाठी दिला, हे एक उत्तम उदाहरण आहे. माझ्या संपत्तीचा पंचवीस ते पस्तीस टक्के किंवा एक तृतीयांश पैसा दानासाठी आहे, असे म्हणणारे खूपच कमी लोक भारतात असतील. हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू आहे. त्यांनी अनेक कंपन्यांच्या संचालक पदावरही काम केले. अनेक कंपन्यांची जाहिरात केली. मार्गदर्शनासाठी ते सदैव तत्पर असायचे. त्यांच्या जाण्याने शेअर बाजाराचे आणि देशाचेही मोठे नुकसान झाले आहे, असे मला वाटते. त्याची भरपाई होणे खूपच कठीण आहे.
(लेखक फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)

