

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : राजकारणात सक्रिय असलेल्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुस्तक भगवद्गीतेसारखे आहे, असे कौतुकोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काढले. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 20 वर्षांतील अनुभवांवर आधारित लिहिलेल्या 'मोदी अॅट 20 : ड्रीम्स मीट डीलिव्हरी' या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती व्यंकया नायडू आणि शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मोदींच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदाच्या एकूण 20 वर्षांच्या कालावधीवर आधारित हे पुस्तक आहे.
अमित शहा म्हणाले, पुस्तकातील अध्यायांवर मी बोलणार नाही. तर मोदींबाबत बोलेन. पुस्तकात मोदींच्या 20 वर्षांतील कामाची माहिती आहे, पण त्यापूर्वीचया 30 वर्षांतील मोदींचा प्रवास जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. एक व्यक्ती जी ग्रामपंचायत सदस्यही नव्हती, आज जागतिक नेता बनली आहे. हे कसे झाले, हे जाणून घेणे गरजेचे आहे. मोदींनी 30 वर्षे संघटनेत काम केले. दुचाकी, बस, रिक्षा, पायी प्रवास करून ते लोकांपर्यंत पोहोचत होतेे.
सर्वांसोबत एकत्र बसून जेवत होते. धोरण ठरवताना प्रत्येकाचे मत लक्षात घेण्याचा विचार येतो कुठून? याचे उत्तर मोदींच्या त्या 30 वर्षांच्या अनुभवात आहे.
समस्या जाणून घेतल्या, त्याचे विश्लेषण केले आणि त्यावरील उपाय शोधला. अशाप्रकारे ते एक यशस्वी मुख्यमंत्री ठरले आणि पंतप्रधान म्हणूनही त्यांनी स्वतःची जागा निर्माण केली. सामान्य लोकांबाबत कणव नसलेला व्यक्ती मोदी बनू शकत नाही. मोदींना निवडणुकीचा कोणताही अनुभव नव्हता आणि ते मुख्यमंत्री बनले.
अचानकपणे त्यांना भूकंपपीडित राज्याचा मुख्यमंत्री बनवले गेले. त्यानतंरही वारंवार निवडून येणे, प्रभावी नेतृत्व करणे महत्त्वाचे आहे. लहानपणी गरिबी अनुभवल्याने ते गरिबांच्या समस्यांशी परिचित होते. गुजरातमधील विकास सर्वसमावेशक आहे. त्यातून मोदींची ओळख पटते.