

देशातील सुमारे 50 लाख तरुण हेरॉईनसारख्या अमली पदार्थांच्या विळख्यात अडकले आहेत. हेरॉईन आणि अन्य अमली पदार्थांबरोबरच विविध औषधांचाही नशेसाठी वापर करण्याचे प्रमाण भारतात वाढत आहे. सशक्त तरुण पिढी आणि देदीप्यमान भविष्यासाठी अमली पदार्थांचा राक्षस गाडलाच पाहिजे.
गुजरातमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने कच्छ येथील मुंद्रा बंदरावर तीन हजार किलो हेरॉईन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या हेरॉईनची किंमत सुमारे 9 हजार कोटी रुपये आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली असून काही अफगाणी नागरिकांचा शोध सुरू आहे. या छाप्यानंतर दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, गांधीधाम, मांडवी येथेही छापेमारी आणि तपास सुरू आहे. मुंद्रा बंदराची मालकी अदानी पोर्ट यांच्याकडे आहे. अदानी पोर्ट ही प्रथितयश उद्योजक गौतम अदानी यांची कंपनी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज, तेही अदानी समूहाच्या ताब्यात असणार्या बंदरावर सापडल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारला विरोधी पक्षांनी लक्ष्य केले. हेरॉईनचे हे मोठे घबाड अफगाणिस्तानातून आले होते आणि ते ऑस्ट्रेलियाला जाणार होते, असा दावा केला जात आहे. या घटनेमागे तालिबानचा हात असल्याचेही बोलले जात आहे. अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा झाल्यानंतर अमली पदार्थांची तस्करी जगभरात वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाला हेरॉईन भारतामार्गे का पाठवले, तसेच संपूर्ण जगभरात हेरॉईनचे नेटवर्क कसे काम करते, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
अफगाणिस्तान हा जगातील सर्वांत मोठा हेरॉईन उत्पादक देश आहे. जगभरातील हेरॉईनच्या एकूण उत्पादनापैकी 75-80 टक्के उत्पादन अफगाणिस्तानात होते. इराण, पाकिस्तान या शेजारी देशांच्या मार्गाने जगभरात त्याची तस्करी केली जाते. गांजा आणि हशीशचे उत्पादनही अफगाणिस्तानातच सर्वाधिक होते. ओपियम पॉपी नावाच्या रोपाच्या फुलापासून मिळणार्या लॅटेक्समधून हेरॉईन तयार केले जाते. एका फुलापासून सुमारे 30 ग्रॅम लॅटेक्स मिळतो. तो सुकवून ओपियम म्हणजेच अफीम तयार केले जाते. ओपियममध्ये 12 टक्केअल्कोलाईड मॉर्फिन असते. हेच मॉर्फिन अन्य रसायनांमध्ये मिसळून हेरॉईन तयार केले जाते.
अफगाणिस्तानातून हेरॉईन भारतात पाठविण्याचे दोनच मार्ग आहेत. पहिला मार्ग रस्त्याचा, तर दुसरा सागरी आहे. रस्त्यावरून पाठविण्यासाठी हेरॉईन आधी पाकिस्तानमध्ये पाठविले जाते. तेथून पंजाब आणि राजस्थानमार्गे हेरॉईन भारतात येते. अर्थात, पंजाबमार्गे येणार्या हेरॉईनचे जास्तीत जास्त प्रमाण 500 किलो एवढेच असते. दुसरीकडे समुद्रमार्गे हेरॉईन भारतात पाठविण्यासाठीही पाकिस्तान हेच प्रमुख माध्यम ठरते. यामार्गे पाठविताना हेरॉईन आधी पाकिस्तानातून मोझांबिकला पाठविले जाते. तेथून ते दक्षिण भारताच्या किनारी प्रदेशात उतरविले जाते. याच मार्गाचा वापर हेरॉईन ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचविण्यासाठी केला जातो. सर्वात महत्त्वाची बाब अशी की, अफगाणिस्तानमार्गे अमली पदार्थ संपूर्ण जगभरात पोहोचविण्यासाठी फक्त तीन मार्गांचाच वापर केला जातो. यातील पहिला म्हणजे बाल्कन रूट. यामार्गे संपूर्ण युरोपात पुरवठा केला जातो. त्यानंतर नॉर्दर्न रूटमार्गे अमेरिकेपर्यंतच्या देशांना अमली पदार्थांचा पुरवठा केला जातो. तिसरा रस्ता दक्षिणेकडील मार्ग असून, त्या मार्गाने ऑस्ट्रेलियापर्यंत ड्रग्ज पोहोचविले जातात.
अफगाणिस्तानातील 34 प्रांतांपैकी 22 प्रांतांत ओपियमची शेती होते. त्यातही 98 टक्के शेती फराह, हेलमंद, कंधार, निमरोज, उरुजगान आणि जाबुलमध्ये होते. 1994 मध्ये अफगाणिस्तानात 70 हजार हेक्टर क्षेत्रावर अफीमचे उत्पादन घेतले होते. 2020 पर्यंत हा आकडा वाढतच गेला आणि तो 2 लाख 20 हजार हेक्टरवर पोहोचला. संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार, एक किलो हेरॉईन उत्पादनावर सुमारे एक कोटी रुपये एवढा खर्च येतो. परंतु, तस्करीमुळे त्याची किंमत तब्बल सातपट वाढते. याच कारणामुळे भारतीय बाजारात हेरॉईनची किंमत सात कोटी रुपये प्रतिकिलो असल्याचे सांगितले जाते. म्यानमारमध्येही जगातील एकूण उत्पादनापैकी 20-25 टक्के हेरॉईनचे उत्पादन होते. अफगाणिस्तानातील हेलमंद प्रांतात तेथील उत्पादनापैकी दोन तृतीयांश उत्पादन होते. हेलमंद प्रांतात हेरॉईनला 'चौथी बिवी' हा दर्जा दिला जातो.
वस्तुतः अफगाणिस्तानात चौथा विवाह करतेवेळी माणूस वयाच्या ज्या टप्प्यावर पोहोचलेला असतो, त्यावेळी मेहेरची प्रचंड रक्कम चुकती करण्यासाठी ओपियमची शेतीच त्याला मोठा आधार देते. बॉलिवूडमध्ये किंग खान म्हणून ओळखल्या जाणार्या शाहरूख खानचा पुत्र आर्यन हा एका क्रूझ बोटीवरील रेव्ह पार्टीत ड्रग्ज सेवन केल्याच्या आरोपाखाली अटकेत आहे. भालाफेकीत देशाला सुवर्ण पदक मिळवून देणारा 23 वर्षांचा नीरज चोपडा आणि आर्यनचे वय एकसारखेच आहे. त्यामुळे विशेषतः तरुण पिढीची चिंता वाटण्यासारखे वृत्त आहे. ड्रग्जच्या विळख्यात तरुण पिढी सापडली आहे आणि या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर या युवा पिढीची चिंता भारताने प्रामुख्याने करायला हवी. 35 वर्षांपेक्षा कमी वय असलेली लोकसंख्या भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 65 टक्के आहे. म्हणूनच भारताला तरुणांचा देश मानले गेले आहे आणि या युवाशक्तीच्या बळावर भारत प्रगतीच्या दिशेने मोठी मजल मारू शकतो, असे वारंवार सांगितले जाते. परंतु, देशाच्या याच आघाडीवरच्या मजबूत फळीला अमली पदार्थांसह अन्य व्यसने अक्षरशः कुरतडत आहेत. चाईल्ड लाईन इंडिया फाऊंडेशनच्या 2014 च्या सर्वेक्षणानुसार देशातील युवा पिढी मोठ्या प्रमाणावर नशेच्या आहारी गेली आहे. सरकारी आकडेवारी पाहिल्यास देशातील सुमारे 50 लाख तरुण हेरॉईनसारख्या अमली पदार्थांच्या विळख्यात अडकले आहेत.
एका आकडेवारीनुसार, देशातील 90 ते 95 लाख लोक दररोज भांगेची नशा करतात. 1992 ते 2012 पर्यंत अवघ्या वीस वर्षांत देशात मद्य सेवनात 55 टक्के वाढ झाली. 1992 मध्ये 300 लोकांमधील एकाला दारूचे व्यसन होते, तर 2012 मध्ये 20 पैकी एकजण दारू पितो. सध्या अमली पदार्थांच्या नशेचा राक्षस देशाला कुरतडू लागला आहे. याखेरीज तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे जगभरात दरवर्षी 54 लाख लोकांचा मृत्यू होतो आणि त्यापैकी 9 लाख लोक आपल्या देशातील असतात. तरुण पिढीला वाचवायचे असेल आणि त्यांच्या मदतीने एक सशक्त भारत उभा राहावा, असे वाटत असेल, तर पहिल्यांदा आपल्याला ही व्यसने आणि सर्व प्रकारच्या नशेखोरीला चाप लावावा लागेल.