अमरनाथ येथील ढगफुटीतून सांगली, बेळगावचे दोन भाविक बचावले

अमरनाथ येथील ढगफुटीतून सांगली, बेळगावचे दोन भाविक बचावले
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा : अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीच्या आपत्तीतून सांगलीचे रवींद्र काळेबेरे व बेळगावचे विनोद काकडे हे दोन यात्रेकरू बचावले आहेत. प्रसंगावधान राखत तंबूतून बाहेर पळत सुरक्षित ठिकाणी गेल्‍याने ते दुर्घटनेतून बचावले. सांगली, कोल्हापूर, शिरोळ, जयसिंगपूर तसेच सातारा, पुणे, बेंगलोर, बेळगाव येथील ५० यात्रेकरूंनी अमरनाथ यात्रा अर्ध्यावर सोडून परतीचा मार्ग धरला आहे, अशी माहिती यात्रेकरूंनी दिली.

मिरज येथून दि. २ जुलै रोजी ५० भाविक रेल्वेने अमरनाथ यात्रेसाठी गेले होते. गुरूवारी (दि. ७ जुलै) अमरनाथ बेस कॅम्प (बाल्टाल) येथे हे यात्रेकरू मुक्कामी होते. तर शुक्रवारी (दि. ८) अमरनाथकडे शिवलिंग दर्शन घेण्यास जाणार होते. शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून पहलगामजवळील पंचतरणे गाव परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला. दुपारी ३ वाजता लष्करी अधिकारी, जवानांकडून प्रतिकूल हवामानासंदर्भात सूचना देण्यात आल्‍या होत्‍या. त्यामुळे बेस कॅम्पमधील यात्रेकरूंना पुढे अमरनाथ गुहेकडे जाऊ दिले नाही. अमरनाथ गुहेजवळ एक-दोन किलोमीटर अंतरावर ढगफुटी झाली होती. डोंगरावरून आलेल्या जोरदार पाण्याचा प्रवाहाने भाविकांसाठी उभारलेले काही तंबू आणि दोन लंगर वाहून गेले.

तसेच, दर्शन पास उपलब्ध न झाल्याने आणि खराब हवामानामुळे त्यांना बेस कॅम्पला ठेवण्यात आले होते. तर ५० यात्रेकरूपैकी ४८ यात्रेकरू बाल्टाल बेस कॅम्पला होते आणि हा बेस कॅम्प अमरनाथ गुहेपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आहे.

विनोद काकडे (बेळगाव) यांचे भाऊ श्रीनगरला सैन्यात आहेत. त्यांच्यासोबत काकडे व काळेबरे (सांगली) हे बाल्टाल बेस कॅम्पहून अमरनाथकडे पुढे गेले होते. अमरनाथजवळील भाविकांसाठीच्या तंबूत ते थांबले होते. प्रसंगावधान राखून ते वेळीच तंबूबाहेर पडत सुरक्षित स्थळी गेले व त्यामुळे बचावले. सांगलीचे काळेबरे हे एका दैनिकाचे छायाचित्रकार आहेत. अमरनाथ यात्रेसाठी गेलेले हे सर्व ५० यात्रेकरू शनिवारी बाल्टाल बेस कॅम्पहून सुखरूप बाहेर पडले.

मदत व बचावकार्य सुरू असल्याने अमरनाथ यात्रा पाच दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे हे यात्रेकरू परतीच्या मार्गावर आहेत. जम्मूतील कटरा शहराजवळील वैष्णो देवीचे दर्शन करून हे सर्व यात्रेकरू परत येणार आहेत. सर्व ५० यात्रेकरू सुखरूप आहेत.

मिलिंद धामणीकर, सुमिधा धामणीकर, विशाल माळी, सीमा माने, प्रज्ञा म्हत्रे, बेबीताई माळी, वैशाली जाधव, शर्वरी भट (धामणीकर), विनायक पटवर्धन, सुनीता पटवर्धन, रोहिणी गोरे, नारायण गोरे, मोहन बापट, राधिका बापट, अविनाश मोहिते, सविता मोहिते, निरज देवळेकर, शितल माने, किशोर सुतार, अरूण जाधव, प्रसाद रानडे, मिलिंद शेंडे, विठ्ठल चव्हाण, संतोष जोशी, दत्तात्रय कुलकर्णी, सुहास जोशी, पंढरीनाथ सपकाळ, सुनील कारंजकर, शंकर जाधव, धनंजय गोखले, अनुजा गोखले, आदित्य गोखले, सुभाष पोवार, ओंकार रोकडे, रजनी ओगले, स्नेहल कानिटकर, देवयानी दप्तरदार, सायली जकाती, श्रद्धा वझे, हंसा कोठारी, श्रीपाद रानडे, मिताली शिंदे, रवि काळेबेरे, गंधाार धामणीकर, सृष्टी म्हेत्रे, शांभवी धामणीकर, शुभांगी दिक्षित, प्रगती खाडीलकर, सचिन पोतदार, विनोद काकडे आदी भावीक सुखरूप परतले आहेत.

जिल्‍हे आणि भाविकांची संख्या

सांगली : 33
कोल्हापूर : 2
शिरोळ : 2 जयसिंगपूर: 4
सातारा : 3 पुणे : 3
मुंबई : 1
बेळगाव : 1 बेंगलोर : 1

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news