अभिमानास्पद यश

अभिमानास्पद यश
Published on
Updated on

चंद्रावर गेल्यानंतर तुम्ही केवळ फोनवरूनच नव्हे तर व्हॉईस कॉलच्या माध्यमातूनही स्मार्टफोनवर बोलण्याचा आनंद लुटू शकाल, असे काही वर्षांपूर्वी सांगितले असते तर तुमचा विश्वास बसला नसता. परंतु; आता लवकरच ते शक्य होणार आहे. चंद्रावर 4-जी नेटवर्कच्या मदतीने तुम्ही बेस स्टेशनवर हाय डेफिनेशनमध्ये व्हिडीओ चालवू शकाल. या प्रकल्पाची धुरा एका भारतीयाच्या हाती आहे, याचा आपल्याला अभिमान असायला हवा.

आपण यापूर्वीच शोधलेले ज्ञान आणि नवीन ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया या दोहोंचा भाग म्हणून विज्ञानाचा विचार केला जाऊ शकतो. ज्ञान आणि प्रक्रिया एकमेकांवर अवलंबून असतात. निसर्गाचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता मानवाला नेहमीच असते. याच उत्सुकतेचे फलित म्हणून माणूस चंद्रावरही पोहोचला. माणसाने अंतरिक्षात इतके प्रयोग केले आहेत की, अंतरिक्षाचे संपूर्ण रहस्य समोर आले आहे. विज्ञानाच्या आधारे मानवाने चंद्रावर वसाहती बनविण्याचीही कल्पना केली. स्पेस टुरिझम हादेखील श्रीमंत कंपन्यांचा व्यवसाय बनला. विज्ञान एवढी प्रगती करेल याची कल्पनाही एकेकाळी माणसाने केली नव्हती. आता लवकरच चंद्रावर हायस्पीड इंटरनेटची सुविधा उपलब्ध होणार आहे. नासा ही अमेरिकी अंतरिक्ष संंशोधन संस्था आणि नोकिया कंपनी संयुक्तपणे चंद्रावर 4-जी एलटीई कनेक्टिव्हिटी उपलब्ध करणार आहेत. भविष्यासाठी नासाची योजना अशी आहे की, मानव चंद्रावर पुन्हा एकदा जाईल आणि मानवी वसाहती स्थापन करील. 2024 पर्यंत मानवाला चंद्रावर नेण्याचे नासाचे उद्दिष्ट आहे. चंद्रावर 4-जी नेटवर्क उभारण्यासाठी ज्यांची निवड करण्यात आली आहे, ते आहेत नोकियाचे चीफ स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजी ऑफिसर निशांत बत्रा.

या प्रकल्पाची धुरा एका भारतीयाच्या हाती आहे, याचा आपल्याला अभिमान असायला हवा. निशांत बत्रा यांचा जन्म दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. इंदूर (मध्य प्रदेश) येथील अहिल्यादेवी विद्यापीठातून त्यांनी संगणकशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. निशांत बत्रा यांना टेलिकॉम क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते एरिक्सन कंपनीत दहा वर्षांपेक्षा अधिक काळ होते आणि जानेवारी 2020 मध्ये ते नोकियामध्ये रुजू झाले. भारतातील अभियंते आणि आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ हे जगात सर्वोत्कृष्ट आहेत आणि ते या क्षणी तंत्रज्ञानाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भविष्यातही ते अशीच भूमिका बजावणार आहेत. आता भारतातही अ‍ॅप्लाईड इनोव्हेशनमध्ये मोठे काम केले जात आहे. भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेने (इस्रो) मानवाला अंतरिक्षात पाठविण्याच्या मोहिमेवर काम सुरू केले आहे. आतापर्यंत केवळ नासानेच चंद्रावर मानवयुक्त मोहिमा केल्या आहेत. नील आर्मस्ट्राँग हा 1969 मध्ये चंद्रावर उतरणारा पहिला मानव होता.

नासाला 2024 पर्यंत चंद्रावर मानव पाठविण्याआधी तेथे संपर्कयंत्रणा प्रस्थापित करायची आहे. आता निशांत बत्रा यांच्या नेतृत्वाखाली चंद्रावरील लूनर नेटवर्क काही महिन्यांतच सत्यात उतरेल. नोकियाचे म्हणणे असे आहे की, त्यांच्या आर्मबेल संशोधन प्रयोगशाळेतील नवकल्पनांचा उपयोग चंद्राच्या पृष्ठभागावर अल्ट्रा-कॉम्पॅक्ट, लघुशक्ती, स्पेस-टाईट एन्ड-टू-एन्ड एलटीई सोल्युशन विकसित आणि तैनात करण्यासाठी केला जाईल. नोकियाने अशा 14 कंपन्यांशी करार केला आहे की, ज्या लूनर लँडरच्या मदतीने चंद्रावर आवश्यक उपकरणे पोहोचवतील. त्यामुळे चंद्रावर जाणार्‍या प्रवाशांना थेट कॉल करण्याची सुविधा मिळेल. हे नेटवर्क अंतराळवीरांना व्हॉईस आणि व्हिडीओ या कम्युनिकेशन सुविधा प्रदान करेल.

नेटवर्क अशा प्रकारे तयार केले जाईल की, ते प्रतिकूल परिस्थितीत लूनर आणि लूनर लँडरच्या लाँचच्या वेळी आणि अंतरिक्षातही कार्यरत राहू शकेल. चंद्रावरील विजेची कमतरता भरून काढण्यासाठीही काही उपकरणे चंद्रावर पाठविली जातील. प्रकल्पासाठी नासाने नोकियाला 14.1 दशलक्ष डॉलरचा निधी दिला आहे.

– कमलेश गिरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news