अब्दुल कादिरखान : देशभक्त की अणुतस्कर?

अब्दुल कादिरखान : देशभक्त की अणुतस्कर?
Published on
Updated on

पाकिस्तानचा अणुबॉम्ब आकारास येत असताना त्याची माहिती अमेरिकेस होतीच; पण त्या वेळेस अमेरिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, अब्दुल कादिरखान यांची 'अणुतस्कर' ही ओळख जगापुढे आली नाही. आज त्यांच्या नावे पाकिस्तानात रस्ते आहेत, चौक आहेत. एक अणुतस्कर देशभक्त म्हणून ओळखला जातो आहे.

पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जाणारे अब्दुल कादिरखान यांचे नुकतेच निधन झाले. पाकिस्तानात जरी त्यांची ओळख पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक म्हणून असली, तरी जग त्यांना अणुतंत्रज्ञानाचे तस्कर व बनावट अणुशास्त्रज्ञ म्हणून ओळखते. नंतरच्या काळात त्यांनी हे आरोप मान्य केले व त्याबद्दल त्यांना स्थानबद्धतेतही राहावे लागले. खरे तर पाकिस्तानी अणुबॉम्बची कल्पना मांडण्याचे व ती राबवण्याचे श्रेय पाकिस्तानी अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष राहिलेले शास्त्रज्ञ मुनीरखान यांच्याकडे जाते.

1971 च्या बांगला देश युद्धात पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्यानंतर तेव्हाचे पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फीकार अली भुट्टो यांनी 'गवत खाऊ; पण अणुबॉम्ब बनवू,' अशी घोषणा केल्यावर मुनीरखान यांनीच पाकिस्तानला अणुबॉम्ब बनवणे शक्य असल्याचे भुट्टो यांना पटवून दिले होते; पण मुळात प्रश्न होता तो अणुबॉम्बसाठी लागणारे युरेनियम समृद्ध करण्यासाठी हवे असलेले सेंट्रिफ्युज तयार करण्याचे तंत्रज्ञान मिळवण्याचा. हे तंत्रज्ञान पाककडे नव्हते.

त्यावेळी अब्दुल कादिरखान हे नेदरलँडमध्ये अँग्लो-डच-जर्मन इंजिनिअरिंग कंपनी 'युरेन्को' या कंपनीत धातुशास्त्रज्ञ म्हणून काम करीत होते. त्यांना भुट्टो यांच्या अणुमहत्त्वाकांक्षेची माहिती मिळताच त्यांनी या कंपनीतून सेंट्रिफ्युजचे आराखडे चोरले व थेट भुट्टो यांची भेट घेऊन त्यांना दाखवले व आपण अणुबॉम्ब तयार करू शकतो, असे सांगितले. त्यामुळे भुट्टो यांनी मुनीरखान यांना बाजूला ठेवले व अब्दुल कादिरखान यांच्याकडे पाकिस्तानी अणुबॉम्बची सूत्रे सोपवली; पण चोरलेल्या माहितीपलीकडे खान यांच्याकडे काहीही नव्हते.

तेव्हा त्यांनी अणुतंत्रज्ञानाची चोरटी आयात करण्यासाठी इराण, लिबिया आणि उत्तर कोरियाच्या मदतीने एक टोळी स्थापन केली. या टोळीने त्यांच्या हाती तस्करीतून आलेल्या अणुतंत्रज्ञानाच्या माहितीची देवाण-घेवाण व विक्री सुरू केली. या टोळीचे नेतृत्व अब्दुल कादिरखान यांच्याकडे होते. आज पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश आहे. उत्तर कोरिया हा अघोषित अण्वस्त्रधारी देश आहे, इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांमुळे अडकला आहे, तर लिबियाचा अणुकार्यक्रम पूर्णत्वाला जाण्याआधीच इस्रायलने उद्ध्वस्त करून टाकला आहे.

पाकिस्तानी अणुबॉम्ब कार्यक्रमाची सूत्रे हाती येताच अब्दुल कादिरखान यांनी काही वृत्तपत्रांना हाताशी धरून आपली 'पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक' ही प्रतिमा प्रस्थापित केली. भुट्टो यांच्या हत्येनंतर त्यांनी पाकचे तेव्हाचे हुकूमशहा जनरल झिया उल हक यांच्याशी संधान बांधले व चोरट्या मार्गाने पाकिस्तानात अणुभट्ट्या बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला. 1978 मध्ये पाकने युरेनियम समृद्धीत यश मिळवले व 1984 पर्यंत त्यांची पहिला अणुस्फोट करण्याची तयारी पूर्ण झाली होती.

त्यामुळे 1998 साली भारताने आपली दुसरी अणुचाचणी करताच पाकिस्ताननेही केली व आपण अण्वस्त्रधारी असल्याचे घोषित केले. याचा परिणाम या दोन्ही देशांवर जागतिक निर्बंध लादण्यात झाले; पण त्याचा फटका भारतापेक्षा पाकिस्तानला अधिक बसला. कारण, यानंतर अब्दुल कादिरखान यांचे अणुतस्करी रॅकेट उघड चर्चिले जाऊ लागले व अमेरिकेने पाकिस्तानवर खान यांना अटक करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.

परिणामी, त्यावेळचे पाकिस्तानी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी 2001 साली खान यांना कहुटा अणुसंशोधन प्रयोगशाळेच्या अध्यक्षपदावरून काढून अध्यक्षांचे विज्ञान सल्लागार केले; पण त्यामुळे अमेरिकेचे समाधान न झाल्याने आंतरराष्ट्रीय अणुशक्ती आयोगाने खान यांच्यावरील आरोपांचे एक पत्र मुशर्रफ यांना पाठविले. त्यामुळे खान यांची चौकशी सुरू झाली. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरातच स्थानबद्ध करण्यात आले. नंतर 2008 साली एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत खान यांनी सांगितले की, पाकिस्तानचा अणुकार्यक्रम आंतरराष्ट्रीय दबावाखाली आला असताना मी सर्व आरोप आपल्या अंगावर घेतले व हा कार्यक्रम वाचवला.

एकंदरच आपण 'पाकिस्तानी अणुबॉम्बचे जनक' व 'थोर देशभक्त' ही भूमिका सोडण्यास अब्दुल कादिखान तयार नव्हते; पण यानंतरच्या काळात खान यांच्याभोवतीचे वलय ओसरत गेले व ते काही काळ विजनवासात गेले; पण आपल्या लोकप्रियतेचा राजकीय फायदा उठवण्याचा नंतर त्यांनी प्रयत्न केला. 2012 साली त्यांनी 'तहरिके पाकिस्तान तहाफुज' (पाकिस्तान बचाव) हा राजकीय पक्ष काढून निवडणुका लढवल्या; पण त्यांचे सर्व 111 उमेदवार पराभूत झाले आणि खान यांच्या कारकिर्दीवर पडदा पडला.

पण, त्यानंतरही त्यांनी प्रकाशात राहण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. नंतर त्यांनी 'जंग' या पाकिस्तानी उर्दू दैनिकाला मुलाखत देऊन झुल्फीकार अली भुट्टो यांच्या सांगण्यावरून आपण दोन देशांना अणुतंत्रज्ञान दिले, असे कबूल केले; पण या दोन देशांची नावे त्यांनी सांगितली नाहीत. अर्थात, भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने त्यांचा हा आरोप फेटाळून लावला.

दोन वर्षांपूर्वी 'पाकिस्तान डिफेन्स जर्नल'मध्ये एम. ए. चौधरी यांनी लिहिलेल्या एका दीर्घ व अभ्यासपूर्ण लेखात म्हटले आहे की, अब्दुल कादिरखान यांचा उदो उदो झाल्यामुळे मुनीरखान यांनी युरेनियम खनिज काढण्यापासून ते अणुबॉम्ब तयार करण्यापर्यंतचा आराखडा आखून पाक अणुबॉम्बनिर्मितीला जी चालना दिली होती, ती पडद्याआड राहिली आहे.

मुनीरखान हे 1958 पासून आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेत काम करीत होते व त्यांच्याकडे अणुकार्यक्रमासाठी लागणारे सर्व ज्ञान होते. त्यांनी प्रथम अयुबखान व नंतर भुट्टो यांच्याकडे यासंबंधीचा पूर्ण आराखडा मांडला होता. मुनीर यांनीच नंतर अब्दुल कादिरखान यांना या कार्यक्रमात घेतले होते; पण नंतर अब्दुल कादिरखान यांनी या कार्यक्रमाचा ताबा घेतला.

नंतर मुनीर हे फक्त पाक अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष राहिले व पाक अणुस्फोट झाल्यानंतर एक वर्षाने म्हणजे 1999 साली त्यांचे निधन झाले. मुनीर यांचा मोठा दोष म्हणजे ते 1986 ते 87 असे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे अध्यक्ष असताना त्यांनी अब्दुल कादिरखान स्वत:च्या फायद्यासाठी काही देशांना अणुतंत्रज्ञान विकत होते, त्याकडे दुर्लक्ष केले. या संस्थेचे अध्यक्ष म्हणून हे रोखण्याची त्यांची जबाबदारी होती; पण पाक अणुकार्यक्रमाच्या आड आपण आलो, असा आरोप होईल या भीतीने त्यांनी हे दुर्लक्ष केले.

अर्थात, पाक अणुबॉम्ब आकारास येताना त्याची माहिती अमेरिकेस नव्हती, असे म्हणता येणार नाही; पण त्या वेळेस अमेरिकेने आपल्या राजकीय हेतूंमुळे त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, अब्दुल कादिरखान यांची 'अणुतस्कर' ही ओळख जगापुढे आली नाही; अन्यथा तेव्हाच त्यांचे पितळ उघडे पडले असते. आज अब्दुल कादिरखान यांच्या नावे पाकिस्तानात रस्ते आहेत, चौक आहेत, त्यांची छायाचित्रे शाळा, कॉलेजात लावली जात आहेत. एक अणुतस्कर देशभक्त म्हणून ओळखला जातो आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news