

वॉशिंग्टन ; वृत्तसंस्था : एकेकाळी जे गृहस्थ सहा अब्ज डॉलरचा खजिना सांभाळत होते, त्यांच्यावर सध्या अमेरिकेत टॅक्सी चालवून पोट भरण्याची वेळ आली आहे. ही करुण कथा आहे अफगाणिस्तान चे अर्थमंत्री राहिलेल्या खालिद पाएंदा यांची.
एकेकाळी 'गांधार' म्हणून ओळखल्या जाणार्या अफगाणिस्तानच्या दुर्दशेचे दशावतार गेल्या वर्षी तालिबानने कब्जा केला तेव्हापासून सुरू झाले. तेव्हाचे अध्यक्ष अशरफ घनी परागंदा झाले. बाकीच्या मंत्र्यांनीही मिळेल त्या देशात आश्रय घेतला. खालिद यांना नेसत्या वस्त्रानिशी अफगाणिस्तानातून पळ काढावा लागला.
'वॉशिंग्टन पोस्ट'शी बोलताना खालिद म्हणाले, दोन दिवसांत मला आणखी 50 फेर्या पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतरच 95 डॉलरचा बोनस मिळू शकेल. पत्नी आणि चार मुले असे माझे कुटुंब. थोडीफार बचत आणि टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करताना मिळणारा मेहनताना यावरच गुजराण सुरू आहे. मी अफगाणिस्तानला परतण्याचा विचार स्वप्नातही करू शकत नाही. अमेरिकेतही माझे भवितव्य अनिश्चित आहे.
आज मला चार डॉलरची टिप मिळाली हे खरे; पण उद्याचे काय या विवंचनेने हैराण करून सोडले आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा करण्यापूर्वी काही दिवस आधी मी अर्थमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. लेबनानमधील एका कंपनीकडून येणे असलेली रक्कम वेळेत न वसूल झाल्याबद्दल तेव्हाच अध्यक्ष घनी यांनी माझी हजेरी घेतली होती. त्यामुळे मी लगेच मंत्रिपद सोडले, असे त्यांनी स्पष्ट केले.
15 ऑगस्टपूर्वीच आम्ही अफगाणिस्तान सोडून अमेरिकेचा रस्ता धरला. जगभरातून प्रचंड मदत येत होती; पण सगळी व्यवस्थाच भ्रष्टाचारामुळे सडली होती. त्यातून अराजकसदृश परिस्थिती निर्माण झाली. अशा स्थितीत तालिबानला अफगाणिस्तान वर कब्जा करणे खूपच सोपे झाले, असे निरीक्षण खालिद यांनी नोंदवले.