India Gold Market : भारताची सोने मागणी सहा वर्षांच्या नीचांकावर, वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचा अंदाज, दरवाढीमुळे घटली मागणी

वाढते भाव, कच्च्या तेलाचा भडका आणि दुष्काळी परिस्थितीचा सराफा बाजाराला फटका
India Gold Market : भारताची सोने मागणी सहा वर्षांच्या नीचांकावर, वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचा अंदाज, दरवाढीमुळे घटली मागणी
Pudhari
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : वाढत्या दरामुळे सोन्याच्या दागिन्यांची खरेदी घटली असून, गुंतवणुकीच्या मागणीतही घट झाली आहे. त्यामुळे कॅलेंडर वर्ष २०२६ मध्ये भारताची सोन्याची मागणी सहा वर्षांच्या नीचांकावर येईल, अशी माहिती वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (डब्ल्यूजीसी) मंगळवारी (दि. २) दिली.

भारत चीननंतर जगातील सोन्याचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दराचा भडका उडाला आहे. त्यातच अल निनोमुळे पर्जन्यमान घटल्याने वाढत्या महागाईचा फटका बसत आहे. तसेच, मान्सून कमकुवत राहिल्याने ग्रामीण भागातून दागिन्यांसाठी होणारी मागणीही घटू शकते, असे वर्ल्‍ड गोल्ड कौन्सिलने म्हटले आहे.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे भारतीय कामकाजाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जैन म्हणाले की, वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत दागिन्यांची मागणी घटली आहे. यामुळे एकूण मागणी सुमारे ६५० टनांपर्यंत खाली येईल. जी २०२० नंतरची सर्वात कमी पातळी असेल. कोरोना महामारीमुळे २०२० मध्ये दागिन्यांची दुकाने बंद ठेवावी लागली होती. त्यावर्षी अनिश्चिततेमुळे मागणीत मोठी घसरण झाली होती.

जैन यांच्या मते, जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सोन्याची मागणी वार्षिक आधारावर २९ टक्क्यांनी घसरून १६२.५ टनांवर आली आहे. यात दागिन्यांच्या खरेदीत २० टक्क्यांची, तर गुंतवणुकीच्या मागणीत ४० टक्क्यांची घट झाली आहे. मात्र, दिवाळीसारखे प्रमुख सण आणि लग्‍नसराईच्या काळात सोन्याची खरेदी वाढण्याची शक्यता असल्याने, डिसेंबर तिमाहीत मागणीत सुधारणा होऊ शकते.

मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार, सोन्याचे उच्च दर आणि कमकुवत मान्सूनमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम मागणीवर मर्यादा आणू शकतो. भारतातील सोन्याच्या एकूण मागणीपैकी निम्म्याहून अधिक मागणी ग्रामीण भागातून येते. जिथे लाखो लोकांसाठी दागिने हे संपत्ती साठवण्याचे पारंपरिक साधन आहेत. कॅलेंडर वर्ष २०२६ मध्ये मान्सूनदरम्यान गेल्या दशकातील सर्वात कमी पाऊस झाला, ज्यामुळे कृषी उत्पादनावर परिणाम झाला आणि शेतकऱ्यांचे उत्पन्‍न घटले.

जैन यांनी सांगितले की, सप्टेंबर तिमाहीत भारताची सोन्याची आयात घटली आहे. याचे एक कारण म्हणजे, सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यामुळे अनधिकृत मार्गाने होणारी सोन्याची आवक वाढली आहे.

मागणी घटूनही सोन्याच्या विटेचा भाव कायम

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (डब्ल्यूजीसी) ‘इंडिया फोकस’ अहवालानुसार, सप्टेंबर तिमाहीत भारतातील सोन्याच्या गुंतवणुकीचा सर्वात मोठा मार्ग सोन्याच्या विटा (बार) आणि नाणी हाच राहिला आहे. यातील गुंतवणूक जूनच्या तिमाहीच्या तुलनेत ९ टक्क्यांनी वाढून ५५ टन झाली आहे. मात्र, सप्टेंबर २०२५ च्या तिमाहीच्या तुलनेत गुंतवणूक ४० टक्क्यांनी घटली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.