Politics | गोव्यात काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटण्याऐवजी धुसफूस वाढली ?

Goa Politics | काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव (संघटन) के. सी. वेणुगोपाल अलीकडेच गोव्यात येऊन गेले. पक्षाकडून ही भेट पूर्वनियोजित असल्याचे सांगण्याचा प्रयत्न झाला.
goa congress
goa congress
Published on
Updated on

मयुरेश वाटवे

काँग्रेसचे राष्ट्रीय संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल गोव्यात येऊन गेले. पण काही तोडगा निघण्याऐवजी पक्षातील एका गटाच्या, तसेच मित्रपक्षांच्या मनातील दरी मात्र रुंदावली आहे. अशा उत्साहहीन वातावरणात काँग्रेस विधानसभा निवडणुकीला सामोरी जाणार आहे?

कॉंग्रेसची कोंडी

काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव (संघटन) के. सी. वेणुगोपाल अलीकडेच गोव्यात येऊन गेले. पक्षाकडून ही भेट पूर्वनियोजित असल्याचे सांगण्याचा प्रयत्न झाला. पण प्रत्यक्षात हा खटाटोप कशासाठी होता हे उघड आहे. गिरीश चोडणकर यांना पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी आणण्याचा निर्णय किती योग्य आहे हे कार्यकर्त्यांना पटवून देण्यासाठीच हा दौरा होता. भाजपचे संघटन सचिव बी. एल. संतोष दर दोन तीन महिन्यांनी गोव्याचा दौरा करत असतात.

goa congress
Congress' Dilemma | काँग्रेसची कोंडी

या पार्श्वभूमीवर गेल्या पाच वर्षांत गोव्यात पायही ठेवायला वेळ न मिळालेल्या काँग्रेस महासचिवांना केवळ या एकाच कारणासाठी दौरा करावासा वाटतो यातून काँग्रेस आणि भाजपच्या संस्कृतीतील फरक लक्षात येतो. गिरीश चोडणकर यापूर्वी दोनदा प्रदेशाध्यक्ष झाले आहेत.

दोन्ही वेळा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयश आले. निवडणुकीनंतर पक्ष बांधणीचे अवघड काम अंगावर घेण्याऐवजी पराभवाची जबाबदारी घेऊन ते पदावरून दूर झाले. त्यांच्याच काळात निवडणुकीनंतर एकदा दहा आणि एकदा आठ आमदारांनी भाजपात उडी घेतली. म्हणजे संघटना मजबूत करणे सोडाच आपले आमदार टिकवण्यातही ते अपयशी ठरले. असा ट्रॅक रेकॉर्ड असताना तिसऱ्यांदा त्यांना अध्यक्ष करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेला नाही.

‘अमित पाटकर नकोत तर कुणालाही करा, पण गिरीश नकोत’ अशी तळागाळातील कार्यकर्त्यांची भूमिका होती. तरीही दिल्लीने ठरवले की गिरीशच राहतील. वेणुगोपालांनी कार्यकर्त्यांना सरळ सांगितले, गिरीश प्रदेशाध्यक्ष राहतील. त्यांना सहकार्य करा. मान्य नसेल तर बाहेर पडा. आधीच कमकुवत झालेला पक्ष बळकट करण्याचा हा अजब उपाय आहे. बाजूला झालेले, निलंबित कार्यकर्ते आजही स्वत:ला अभिमानाने काँग्रेसमनच म्हणवतात. त्यांना फक्त एवढेच जाणून घ्यायचे आहे की अमित पाटकर यांना बाजूला का केले गेले.

वेणुगोपाल यांच्या दौऱ्याने काँग्रेसमधील अस्वस्थतेत काडीचाही फरक पडलेला नाही. काँग्रेसचे सर्वात मोठे अपयश म्हणजे योग्य वेळी निर्णय न घेणे. अमित पाटकर आणि गिरीश चोडणकर गटात दरी पडली तेव्हाच तोडगा काढायला हवा होता. स्मार्ट मीटर प्रकरणात गिरीश यांनी विसंगत भूमिका घेतली, दोन कार्यकारिणी सदस्यांना निलंबित करताना कारणही देण्यात आले नाही, काँग्रेसचा सहकारी गोवा फॉरवर्ड पक्षालाही विश्वासात घेण्याचा प्रयत्न झाला नाही.

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी नाराजी व्यक्त करूनही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला नाही. त्यामुळे वेणुगोपाल येऊन गेल्यावरही काहीच बदललेले नाही. कारण त्यांनी समस्या न सोडवता ती केवळ झाकून ठेवली. गिरीशच अध्यक्ष राहतील हे सांगितले, पण कार्यकर्त्यांच्या मनातले प्रश्न अनुत्तरीतच आहेत. ‘गोवा काँग्रेस’ नावाच्या नव्या पक्षासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल झाला आहे.

त्यातील प्रवर्तकांची नावे परिचित नाहीत. मात्र त्यांच्या मागे काँग्रेसमधलाच असंतुष्ट गट आहे अशी शंका अनेकांना आहे. आता हे असंतुष्ट निवडणुकीत काँग्रेसची किती मते फोडतात हे बघावे लागेल. गिरीश यांनी दोनदा पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला. मात्र इतर राज्यांतील प्रभारी पद नाकारले नाही हे विशेष. स्वराज्यात यश मिळवता न आल्याने राजीनामा देणारा नेता अशी जबाबदारी कशी घेऊ शकतो?

goa congress
Goa Assembly Election | नावेलीत पुन्हा कमळ फुलणार?

आता तिसऱ्यांदा त्यांना आणले गेले आहे. वेणुगोपाल यांच्या दौऱ्याने एवढेच स्पष्ट झाले की कार्यकर्त्यांनी हायकमांडचे ऐकले पाहिजे. कार्यकर्त्यांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत काँग्रेस नाही. गोव्यात काँग्रेसला आज मजबूत संघटना हवी आहे. पण पक्षाने तोडगा काढण्याऐवजी समस्या आहे हेच मान्य करायला नकार दिला आहे.

शेवटी या दुहीचा लाभ भाजपलाच होणार आहे. दर निवडणुकी वेळी असे पक्ष निघत असतात. कारणे बदलतात, चेहरे बदलतात, पण खेळ तोच राहतो. तिकीट न मिळाले की नवीन पक्ष, पद न मिळाले की नवीन गट. काँग्रेसला गोव्यात उभे राहायचे असेल तर कार्यकर्त्यांशी संवाद वाढवावा लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news