

चंद्रपूर : जिद्द आणि कष्टाच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणही जगाच्या नकाशावर आपल्या नावाचा ठसा उमटवू शकतो, हे चंद्रपूरच्या सुपुत्राने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूरचे भूमिपुत्र डॉ. विनोद बहाडे यांची दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात भारताचे राजदूत (Ambassador) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विसापूरच्या मातीतून थेट आंतरराष्ट्रीय राजनैतिक स्तरापर्यंतचा त्यांचा हा प्रवास संपूर्ण विदर्भासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे.
भारतीय परराष्ट्र सेवेतील (IFS) 2007 च्या तुकडीतील अधिकारी असलेले डॉ. विनोद बहाडे सध्या परराष्ट्र मंत्रालयात सहसचिव म्हणून दहशतवादविरोधी विभागात कार्यरत आहेत. आपल्या कर्तृत्व, मुत्सद्देगिरी आणि प्रशासनातील कौशल्याच्या जोरावर त्यांनी परराष्ट्र सेवेत विशेष ओळख निर्माण केली आहे.
डॉ. बहाडे यांनी यापूर्वी जगातील विविध महत्त्वाच्या देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांनी व्हिएतनामची राजधानी हनोई, ऑस्ट्रेलियातील सिडनी, इजिप्तची राजधानी कैरो तसेच अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथील भारतीय दूतावासांमध्ये विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. आंतरराष्ट्रीय संबंध, सुरक्षा विषय आणि दहशतवादविरोधी धोरणांवरील त्यांचा अभ्यास आणि अनुभव विशेष मानला जातो.
ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. विसापूरसारख्या छोट्या गावातून बाहेर पडून त्यांनी कठोर परिश्रम, अभ्यास आणि जिद्दीच्या बळावर देशातील सर्वोच्च प्रशासकीय व राजनैतिक सेवेत मानाचे स्थान मिळवले आहे.
त्यांच्या नियुक्तीची बातमी समोर येताच चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.