Rameshwar Someshwar temple restoration : पावसाळ्यात शिखर काम; रामेश्वर-सोमेश्वर मंदिर सुरक्षेचा प्रश्न

बोरीत जुन्‍या दगडांची थातूरमातूर बांधणी; संस्‍थान व ग्रामपंचायतीकडून निकृष्ट साहित्‍य वापराचा आरोप
Rameshwar Someshwar temple restoration
Rameshwar Someshwar temple restorationpudhari photo
Published on
Updated on

बोरी : येथील पुरातन व राज्य संरक्षित रामेश्वर-सोमेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धाराचे काम पावसाळ्यात सुरू असल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मंदिर शिखराचे काम सुरू असताना जुन्या दगडांचा योग्य पद्धतीने वापर होत नसून, वीट, वाळू व पांढर्‍या चुन्याचा वापर होत असल्याचा आरोप मंदिर संस्थान व ग्रामपंचायतीने केला. याबाबत पुरातत्त्व विभाग, पोलीस प्रशासन आणि शासनाकडे तक्रार करून तातडीने पाहणी व चौकशीची मागणी करण्यात आली.

मंदिर जीर्णोद्धाराचे काम काहीकाळ अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर संबंधित कंत्राटदाराकडून पावसाळ्यातच शिखराचे बांधकाम सुरू करण्यात आल्याचे संस्थान व ग्रामपंचायतीने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले. पावसाळ्यात सुरू असलेल्या या कामामुळे माती सैल होणे, पाणी साचणे तसेच बांधकामातील दगड किंवा अन्य साहित्य कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली.

Rameshwar Someshwar temple restoration
Parbhani News : सरपंच अपात्र, ग्रामसेवकाचीही विभागीय चौकशी

मंदिराचे जुने शिखर पाडल्यानंतर त्यातील मोठमोठे पुरातन दगड सध्या सभामंडपाच्या वर काही ठिकाणी पडलेले असल्याचे दिसत आहे. या दगडांची योग्य तांत्रिक पद्धतीने बांधणी न करता थातूरमातूर पद्धतीने बसविण्यात येत असल्याचा आरोप केला. काही ठिकाणी दगडांत फटी दिसत असल्याने भविष्यात बांधकामाच्या मजबुतीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या शिखर बांधकामासाठी वीट, वाळू व पांढरा चुना वापरला जात आहे. बांधकामासाठीचा चुना रस्त्याच्या कडेला मातीत ठेवला असून, पावसामुळे त्यात माती व चिखल मिसळण्याची शक्यता आहे.

अशा साहित्याचा वापर होत असल्यास बांधकामाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, असा आक्षेप ग्रामपंचायत व देवस्थान संस्थानने घेतला. रामेश्वर-सोमेश्वर महादेव मंदिर हे दगडी खांबांवर उभारलेले प्राचीन हेमाडपंथी मंदिर असल्याने त्याच्या मूळ वास्तूचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे. जीर्णोद्धार नावाखाली प्राचीन वास्तूला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये, यासाठी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली काम करावे, अशी मागणी केली.

श्रावण महिन्यासह विविध सण-उत्सव काळात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे सुरू असलेल्या कामाच्या परिसरात मजबूत बॅरिकेड्स उभारून भाविकांच्या प्रवेशावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणीही केली. भाविकांच्या जीविताला धोका निर्माण होण्यापूर्वीच प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. बांधकामात त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, तसेच कामाची गुणवत्ता तपासूनच पुढील बांधकामास परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

Rameshwar Someshwar temple restoration
CM Pramod Sawant | स्थानिक भाज्यांसाठी लवकरच 'गोवा फ्रेश' ब्रँड

दरम्यान, पुरातन धार्मिक स्थळाच्या जीर्णोद्धाराचे काम पावसाळ्यात सुरू ठेवण्याबाबत प्रशासन काय भूमिका घेते आणि बांधकामाची गुणवत्ता तपासण्यासाठी कोणती कार्यवाही केली जाते, याकडे ग्रामस्थ व भाविकांचे लक्ष लागले आहे.

यशवाडीच्‍या घटनेची पुनरावृत्ती नको

परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील मारुती मंदिराच्या सभामंडपाचा भाग कोसळून भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेची पुनरावृत्ती बोरी येथील रामेश्वर-सोमेश्वर मंदिरात होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळीच खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. मंदिराच्या शिखर बांधकामाची तातडीने पाहणी करून वापरण्यात येणारे साहित्य, जुन्या दगडांची बांधणी, शिखराची मजबुती आणि संपूर्ण कामाचा दर्जा यांची तज्ज्ञ यंत्रणेमार्फत तपासणी करावी. तपासणी पूर्ण होईपर्यंत धोकादायक बांधकाम थांबवावे, अशी मागणीही करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news