

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात आज दुपारपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक मेघ गर्जनेसह पावसास सुरुवात झाली. या पावसातच सोसाट्याचा वारा तसेच वीजा चमकून गारांचा पाऊस पडू लागला. अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची मात्र त्रेधातिरपीट उडाल्याचे दिसून आले.
अंबाजोगाई शहर आणि परिसरात सोमवारी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह गारांच्या अवकाळी पावसाने अचानकपणे हजेरी लावली. वादळवाऱ्यामुळे कोणताही घटना घडू नये म्हणून वीजपुरवठा देखील खंडित करावा लागला. सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक वातावरणामध्ये बदल होऊन जोरदार वादळी वाऱ्याला सुरुवात झाली त्यातच गारांचा अवकाळी पाऊसही पडू लागला.
हवामान विभागाने बऱ्याच दिवसांपासून अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार सोमवारी वातावरणामध्ये दुपारपासून अचानकच बदल झाला आणि संपूर्ण वातावरण ढगाळ झाल्याने उन्हाची दाहकता काहीशा प्रमाणात कमी झाली. लगेच आलेल्या वादळी वारा आणि गारांच्या पावसामुळे मात्र चांगलीच त्रेधा तिरपीट उडाली .
दरम्यान अंबाजोगाई तालुक्याच्या ग्रामीण भागात देखील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे. मगरवाडी शिवारात वीज कोसळून सचिन मधुकर मगर (वय 38) हे मयत झाल्याची प्राथमिक माहिती देखील प्राप्त झाली आहे. ग्रामीण भागासह शहराच्या आजुबाजुच्या परिसरामध्येही अचानकच गारांच्या पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे. गारांच्या पावसाने आंबा फळाचे नुकसान झाल्याची माहिती देखील प्राप्त होत आहे. त्याचबरोबर वादळी वाऱ्यामुळे शहरात लावलेले बॅनर तसेच झाडाच्या फांद्या देखील काही ठिकाणी तुटून पडल्या आहेत.
दरम्यान केज तालुक्यात चिंचोली माळी, हादगाव, डोका, सारुकवाडी या परिसरात गारासह अवकाळी पाऊस पडला असून आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच केज, साळेगाव, भाटुंबा आणि चंदन सावरगाव येथेही पाऊस पडला आहे . केज, साळेगाव, भाटुंबा, चंदनसावरगाव या गावात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तर आडगाव येथे विज पडून एक शेळीचा मुत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना बीड जिल्हा रुग्णालय उपचारासाठी रवाना केले आहे.