

ठाणे ; अनुपमा गुंडे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या तसेच परिषदेच्या कारभारातील सावळा गोंधळावर पडदा टाकल्याशिवाय शंभराव्या नाट्यसंमेलन ची घंटा वाजणार नाही. या वादांवर पडदा टाकण्यासाठी विश्वस्त, नियामक मंडळाची बैठक तसेच धर्मादाय आयुक्ताकडील सुनावणीकडे नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदावर दावा करणारे प्रसाद कांबळी आणि नरेश गडेकर यांचे व त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.
परिषेदतील विकोपाला गेलेल्या वादांवर विश्वस्तांनी सद्सदविवेक बुध्दीने घेतलेला निर्णय नियामक मंडळ व कार्यकारिणीला बंधनकारक असल्याची तरतूद परिषदेच्या घटनेत आहे, त्यामुळे नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त व खासदार शरद पवार यांना विश्वासात घेण्यासाठी दोन्ही गटांची धडपड सुरू आहे.
100 व्या नाट्यसंमेलन महाराष्ट्राच्या काही शहरात तसेच अटकेपारही काही उपक्रमांनी साजरे करण्याची घोषणा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष या नात्याने प्रसाद कांबळी यांनी केली होती. पण या घोषणेवर कोरोनाने पाणी फेरले. कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या शिथिलीकरणानंतर भांडणे, वादविवाद पोटात घालून नाशकात साहित्य संमेलन पारही पडले. पण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात महत्वाच्या असलेल्या 100 व्या नाट्यसंमेलनाची चर्चाही नाट्य परिषदेच्या अंतर्गत वादांमुळे पुढे गेलेली नाही.
कोरोना काळात मदतीचा हात म्हणून अध्यक्ष या नात्याने प्रसाद कांबळी यांनी रंगमंच कामगारांना मदत निधीचे वाटप केले. परिषदेच्या घटनेनुसार मदत वाटप केल्याचे कांबळी यांचे म्हणणे आहे,तर नियामक मंडळाला विश्वासात न घेता मदतीचे वाटप केल्यावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर अध्यक्षबदलापर्यंत गेले.
नियामक मंडळाचे 47 सदस्य कांबळी यांच्या विरोधात आहेत. विश्वस्त, नियामक मंडळ त्यांच्या बरोबर नाही, असा दावा करत कांबळी विरोधी गटाने नरेश गडेकरांना अध्यक्षपदी विराजमान केले. त्यानंतर विश्वस्तांच्या ऑक्टोबर मध्ये झालेल्या बैठकीत तीन वर्षांपासून रिक्त असलेल्या 4 जागांवर राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, निर्माते अशोक हांडे आणि नागपूरकर गिरीश गांधी यांची नियुक्ती करण्यात आली. या विश्वस्त नियुक्तीवर कांबळी गटाचा व कार्यवाह व अभिनेते शरद पोंक्षे यांना आक्षेप आहे.
अध्यक्षपदाच्या निवडीबाबत वादावर धर्मादाय कार्यालयाकडे सुनावणीसाठी प्रतीक्षेत आहे. त्यावर येत्या 12 जानेवारीला निर्णय अपेक्षित आहे.
परिषदेच्या नियामक मंडळाच्या आधी विश्वस्तांची बैठक होणे गरजेचे आहे. तहहयात विश्वस्त शरद पवार यांना चुकीची माहिती पुरविण्यात आली आहे, त्यामुळे काही गोष्टी पवार यांच्या निदर्शनास आणून द्यावयाच्या आहेत. तसेच मध्यंतरी झालेल्या विश्वस्तांच्या नेमणुकाही बेकायदेशीर आहेत. सदर बैठक 5 डिसेंबरला होणार होती. पण पवार यांना साहित्य संमेलनाला जायचे असल्याने त्यांनी सदर बैठक पुढे ढकलण्याबाबत मला दूरध्वनीवरून कल्पना दिली.
– शरद पोंक्षे, कार्यवाह
माझ्याकडे अध्यक्षपदाची दिलेली सूत्रे नियमानुसार आहेत. चेंज द रिपोर्ट बाबत धर्मादाय आयुक्तांकडे सुरू असलेली सुनावणी 12 जानेवारी रोजी होणार आहे. कार्यकारिणी बदलाच्या मान्यतेवर तसेच संमेलनाच्या बाबतीत येत्या 10 -15ला सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. परिषदेच्या घटनेतील 17 फ कलमानुसार परिषदेत टोकाला गेलेल्या वादात दोन्ही बाजूंना समोर बसवून विश्वस्तांनी तोडगा काढावा, अशी तरतूद आहे. विश्वस्तांची बैठक होण्याची गरज आहे. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल.
-नरेश गडेकर