अतिवृष्टी, ढगफुटी व उपायांची पंचसूत्री

अतिवृष्टी, ढगफुटी व उपायांची पंचसूत्री
Published on
Updated on

बुधवारी 21 जुलै आणि रात्री बारानंतर सुरू होणारा गुरुवारचा (22 जुलै) कमी वेळातील जास्त पाऊस अशी मोजदाद करता महाराष्ट्रात 30 पेक्षा जास्त ठिकाणी अवघ्या चोवीस तासांत अभूतपूर्व ढगफुटींचा वर्षाव झाला; पण भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) या सर्व ढगफुटी नाकारल्या आहेत. हा जीवघेणा पाऊस म्हणजे अतिवृष्टी किंवा महावृष्टी असल्याचे म्हटले आहे.

ढगफुटींमुळे शेती व शेती संलग्‍न इतर जोडधंदे, व्यवसाय-उद्योग यांना फार मोठा फटका बसला आहे. केवळ महाराष्ट्र नव्हे तर एकंदर देशाच्या अर्थव्यवस्थेला ढगफुटींमुळे मोठा फटका बसणार आहे. म्हणून याकडे गांभीर्याने पाहण्याची, तसेच कृतीशील ठोस निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याची गरज आहे. येत्या काळात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रत्येक व्यक्‍तीला या आपत्तीची किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे 'पार्टी पॉलिटिक्स'मधून बाहेर पडून 'नेशन फर्स्ट' असे समजून सर्व घटकांनी कार्यरत होण्याची गरज आहे. कारण, कोरोनाच्या संकटासारखीच हीसुद्धा एक राष्ट्रीय आपत्तीच आहे.

ढगफुटी म्हणजे काय?
जागतिक हवामान संघटनेच्या (डब्ल्यूएमओ) व्याख्येनुसार कमी वेळात जास्त पाऊस म्हणजे ढगफुटी म्हणजे 'क्लाऊडबस्ट' होय. १५ मिनिटांत २५ मिलिमीटर किंवा एक इंच किंवा ३० मिनिटांत ५० मिलिमीटर किंवा दोन इंच किंवा ४५ मिनिटांत ३ इंच किंवा ७५ मिलिमीटर किंवा एक तासाच्या कालावधीत १०० मिलिमीटर किंवा त्यापेक्षाही अधिक दराचा पाऊस म्हणजे ढगफुटी होय. ढगफुटींचा पाऊस कधीच २४ तास पडत नाही. मान्सूनपूर्व किंवा मान्सून पश्‍चातच्या काळात अस्थिर वातावरणात क्युमुलोनिंबस ढगांमुळे मुख्यत्वे ढगफुटी होते. मान्सून स्थिर झाला की वातावरण स्थिर होते म्हणून मान्सूनमध्ये ढगफुटी होत नाहीत हे आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्‍त विज्ञान आहे. अद्याप मान्सून येऊन स्थिर होणे बाकी आहे हे देखील यातून स्पष्ट होते आहे.

अतिवृष्टी म्हणजे काय?
अतिवृष्टी म्हणजे २४ तासांत ६४ मिलिमीटरपेक्षा जास्त होणारा पाऊस. ६५ मिलिमीटरपेक्षा पाऊस म्हणजे जास्त पाऊस (हेवी) आणि ६५ ते १२५ मिलिमीटर पेक्षा पाऊस म्हणजे खूप जास्त पाऊस (व्हेरी हेवी), तर २५० मिलिमीटर पेक्षा  जास्पा‍त ऊस म्हणजे अत्यंत जास्त पाऊस (एक्स्ट्रीमली हेवी) असे भारतीय हवामानशास्त्र खाते मानते. मात्र, ही पद्धती संदिग्ध,अपुरी, सदोष व गोंधळात टाकणारी आहे. त्याऐवजी २४ तासांतील कोणत्या तासात कोणत्या मिनिटाला किती पाऊस झाला, दर तासाला किती मिलिमीटर पाऊस झाला हे वर्गीकरण हवामान खाते नागरिकांना सांगू शकते, पण तसे होत नाही. दररोज व चोवीस तास सलग असा पाऊस क्वचितच एखाद्या ठिकाणी कोसळतो.

मान्सून पॅटर्न बदल, समुद्राकडून जमिनीकडे येणारे बाष्पयुक्‍त खारे व मतलई वार्‍याची बदललेली प्रक्रिया, वातावरणातील अस्थिरता, निम्बोस्ट्रेटस ढगांपेक्षा अधिक प्रमाणात क्युमुलोनिंबस ढगांची निर्मिती व सायंकाळी साडेचारनंतर वेगाने होणारी तापमानातील घसरण मुख्य शास्त्रीय पाच कारणे आहेत. याच कारणामुळे महाराष्ट्रात ढगफुटींची संख्या अचानक वाढली आहे. ऑगस्ट, सप्टेंबर ते नोव्हेंबर डिसेंबरमध्येदेखील महाराष्ट्र ढगफुटींच्या हिटलिस्टवर राहू शकेल. या काळात कोकण किनारपट्टीनंतर वातावरणातील अस्थिरतेनंतर मराठवाडा, पश्‍चिम व उत्तर महाराष्ट्र व विदर्भातदेखील ढगफुटी होऊ शकतील.

उपायाची पंचसूत्री
धोरणात्मक निर्णय घेताना राष्ट्रीय हित व सुरक्षिततेसाठी मान्सून, चक्रीवादळे, ढगफुटी, गारपीट, दुष्काळ, जलव्यवस्थापन व पूरनियंत्रण यासाठी कृती आराखडा आदी मुद्दे हे प्राधान्यक्रमात असायला हवेत. कारण हवामान बदलामुळे शेतीवर, परिणामी देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्‍का देत थेट वित्तीय फटका बसतो. त्याद‍ृष्टीने पुढील उपायात्मक पंचसूत्री यासाठी राबविणे शक्य आहे.

1) महाराष्ट्रातील ४३ हजार ७२२ गावांमध्ये पर्जन्यमापक बसविणे. 2) महाराष्ट्रात आपत्कालीन व्यवस्थापनासाठी दरवर्षी केंद्र सरकारकडून मिळणार्‍या सुमारे १४ हजार कोटींच्या निधीचा वापर करून राज्यातील सर्व म्हणजे ३६ जिल्ह्यांतील ३५८ तालुक्यांत एक्स बँड डॉप्लर रडार तातडीने बसविणे व कार्यान्वित करणे आवश्यक. 3) महापुराने होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सर्व धरणांतील जलव्यवस्थापन करण्यासाठी हवामान माहिती व धरणकक्ष यांची संलग्‍न २४ बाय ७ चालणारी वॉररूम बनविणे. ४) महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या मोबाईलवर अंदाज नव्हे तर अचूक माहिती व अलर्ट अक्षांश रेखांशनुसार रियल टाईम व कस्टमाईज मिळण्याची व्यवस्था कार्यान्वित करणे. ५) राज्यांना जोडलेल्या केंद्रीय आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाची अथवा मंडळाची स्थापना होणे गरजेचे आहे. त्याद्वारे कृतीशील कार्यक्रमांची अंमलबजावणी होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news