

कोल्हापूर ; एकनाथ नाईक : जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या आरोग्य विभागाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पायाला भिंगरी बांधली आहे. लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू आहे. शासकीय रुग्णालयात ही लस मोफत मिळते. तरी देखील जिल्ह्यातील 1 लाख 32 हजार 540 जणांनी अद्याप एकही डोस घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
20 लाख 4 हजार 970 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. तर 2 लाख 58 हजार 41 जणांचा 84 ते 112 दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यांना दुसर्या डोसचा विसर पडला आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे राज्यात भीतीचे वातावरण आहे. ओमायक्रॉन वाढू नये यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
पुणे आणि मुंबई येथे 100 टक्के पहिला डोस देऊन झाला आहे. तर भंडारा आणि सिंधुदुर्ग 100 टक्के लसीकरणाचे लक्ष्य दृष्टिक्षेपात आहे. येथे जवळपास 98 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 94 टक्के जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस पूर्ण केलेली टक्केवारी 72 टक्के आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर अनेक नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली. पण आरोग्य विभागाने लसीकरणाचे सातत्य कायम ठेवले. लाभार्थ्यांचा वाडी-वस्तीवर जाऊन शोध घेऊन लसीकरण देण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले.
१. आरोग्य विभागाला करावी लागतेय विनवणी
२. शहरातील 4 लाख 28 हजार 960 जणांनी घेतली पहिली लस