

सिंधुदुर्ग, पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्षनेते अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट होत आहे. सर्वांनाच ते माहिती आहे. त्यांच्या सारखा उमदा नेता आमच्या सोबत आला तर आम्हाला आनंदच होईल, असे राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आपल्या वक्तव्यातून केसरकर यांनी एक प्रकारे अजित पवार यांना आपल्या गटात येण्याची ऑफरच दिली.
अजित पवार यांचा शपथविधी सकाळी ऐवजी दुपारी झाला असता तर ते आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते, असे भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांनी म्हटल होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी हे वक्तव्य केले. राजकारणाच्या पलीकडे एकमेकांची मैत्री असू शकते.
अजित पवार यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. ते मोकळेपणाने बोलतात. त्यामुळे त्यांच्यासारखा नेता आमच्या गटात आला तर आम्हाला ते हवेच आहे. अजित पवार यांच्याबद्दल महाविकास आघाडीत नाराजी आहे. खुद्द शरद पवार त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे.