अग्नी-5 ची चाचणी यशस्वी; चीन भारताच्या टप्प्यात

अग्नी-5 ची चाचणी यशस्वी; चीन भारताच्या टप्प्यात
Published on
Updated on

जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या अग्नी-5 क्षेपणास्त्राची भारताने बुधवारी यशस्वी चाचणी केली. पाच हजार किलोमीटरपर्यंतचे कोणतेही लक्ष्य अचूक भेदण्याची क्षमता असणार्‍या या क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशा येथील ए.पी.जे. अब्दुल कलाम बेटावरून रात्री 8 वाजता करण्यात आली.

'अग्नी-5' चीनमधील कोणतेही लक्ष्य भेदण्यास सक्षम असणार आहे. हे क्षेपणास्त्र स्फोटकांव्यतिरिक्त अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे. यामुळे भारताच्या सैन्यदलांची ताकद वाढली आहे.

चीनचा थयथयाट

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून या क्षेपणास्त्राची चाचणी होणार असल्याची चर्चा होती. यामुळे संतापलेल्या चीनने भारताला आशियातील शांतता नकोशी आहे, असा कांगावा सुरू केला होता. या क्षेपणास्त्राची ही 8 वी चाचणी असून, यामुळे भारत अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रांनी सज्ज आठ निवडक देशांमध्ये सामील झाला आहे. पाकिस्तानही 'अग्नी-5' क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येणार आहे.

भारताचे हे शक्तिशाली क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे.

'अग्नी-5'ची वैशिष्ट्ये…

  • आंतरखंडीय क्षेपणास्त्र
  • पाच हजार किलोमीटरपर्यंत मारक क्षमता
  • लांबी 17.5 मीटर असून, व्यास दोन मीटर आहे
  • प्रतिसेकंद 8.16 कि.मी.चे अंतर कापणार
  • एकाचवेळी दीड टन अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता

चीनकडून लडाखमध्ये नवी शस्त्रे, वाहने तैनात

जम्मू ः अनिल साक्षी
गलवानमधील हिंसक झटापटीनंतर पूर्व लडाख सीमेवर भारत आणि चिनी लष्करात तणाव निर्माण झाला. त्यानंतर दोन्ही लष्करांमध्ये उच्च पातळीवर चर्चेच्या अनेक फेर्‍या पार पडत असल्या, तरी दुसरीकडे एकमेकांना शह देण्यासाठी सीमेवर यापूर्वीच भारत आणि चीनने अत्याधुनिक संरक्षण शस्त्रे आणि वाहने तैनात केली आहेत. त्यात आता चीनने सीमेवर नव्या विविध प्रकारच्या तोफांसह बर्फात वेगाने धावणारी अत्याधुनिक वाहने तैनात केली असल्याची माहिती बुधवारी मिळाली.

चिनी लष्कराने या तोफांसह पर्वतराजीतील बर्फात वेगाने धावणार्‍या वाहनांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केली आहेत. अशाप्रकारच्या वाहनांचा भारतीय सीमा सुरक्षा दलाकडून गुजरातमधील कच्छच्या वाळंवटात वापर केला जात आहे. बर्फ आणि दुर्गम पर्वतराजीत असलेल्या चिनी सैनिकांना अन्न आणि अन्य आवश्यक साहित्य पोहोचविण्यासाठी वेगाने जाणारी वाहने तैनात केल्याचे चीनने सोशल मीडियावरील संदेशात म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये चीनच्या पीएलएने पेंगाँग सरोवरामध्ये अत्याधुनिक असॉल्ट मोटारबोटीसह आपल्या नौदलाच्या ताकदीचे प्रदर्शन करत भारतीय लष्कराला एकप्रकारे आव्हान दिले होते. त्यानंतर भारतीय लष्कराने पेंगाँग सरोवर परिसरात गस्त अधिक प्रभावी करण्यासाठी इंटरसेप्टर मोटारबोट उतरविण्यास भाग पाडले होते. इतकेच नव्हे तर इस्त्रायली बनावटीचे 50 स्पाईक तोफविरोधी मिसाईल लाँचर लडाखमध्ये तैनात केले होते.

चीनने नुकतीच तयार केलेली 928-डी नावाची अत्याधुनिक मोटारबोट पेंगाँग सरोवरामध्ये तैनात केली आहे. तिची मारक क्षमता मोठी असल्याची माहिती नेव्हल न्यूज डॉट कॉम या संकेतस्थळाने दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news