

आबुराव, युवराजांच्या मते कोरोनामुळे देशात चाळीस लाख लोक गेले.
असतील बुवा. जाताना प्रत्येक जण यांना हजेरी देऊन गेलेलाही असू शकतो किंवा यांनी एकेक करत चाळीस लाख मोजलेही असतील. हे काहीही करू शकतात.
रिकामा वेळ असणार भरपूर!
ते तर झालंच. शिवाय मध्येमध्ये मोठमोठे आकडे टाकायची हौसपण आहे.
आणखी कुठले मोठे आकडे टाकले त्यांनी?
या चाळीस लाख नागरिकांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपये भरपाई द्यावी, असंही म्हटलंय त्यांनी. शेवटी या गुणाकारातून प्रचंड मोठा आकडाच येणार ना?
फारच मोठी फिगर येणार की!
ती सरकारने निमूट मोजावी, असं म्हणतात ते!
अबब! सरकारवर केवढा बोजा वाढेल यामुळे.
सध्या त्यांचं सरकार नसल्याने ते अशा कल्पना लढवतात बहुधा. विरोधी पक्षांना परवडते अशी चैन.
पण, विरोधी पक्ष म्हणून तरी टिकणार आहेत ते? 'आप'ची आपदा मोठी आहे त्यांच्यासमोर.
मुळात त्यांचे 'आपले' किंवा 'आतले' म्हणण्याजोगे लोक हळूहळू इतर पक्षांना जाऊन मिळताहेत.
नाव बुडायला लागली की, उंदीर पळ काढणारच की हो!
पण, आता त्यांच्याकडे अगदी तिसर्या फळीतही फारशी प्रभावी माणसं राहिली नाहीत.
त्याबद्दल काहीतरी चिंतन बैठक वगैरे घ्यायची की मग!
मेमध्ये होणार म्हणतात. पण, तारीख ठरेना झालीये.
बापरे! इतके बिझी झाल्येत सगळे लोक? एकाला वेळ काढता येईना झालाय?
त्यांच्यात चहूकडे प्रशांती पसरलीये बहुतेक. म्हणून प्रशांत किशोरना नेमलंय वाटतं सल्ला द्यायला? ते फार मुत्सद्दी आहेत म्हणे!
असतीलही. पण, त्यांना एवढ्या जुन्या घरचा सगळा इतिहास, भूगोल, खगोल वगैरे धड माहीत आहे का? ते अशी कुठली जादूची कांडी फिरवणार आहे?
प्रश्नच आहे. पण, खरं म्हणजे आता विचारातही फार वेळ घालवणं परवडणार नाहीये. युवराजांना, महाराणींना कळायला हवंय परिस्थितीचं गांभीर्य. वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा, 2024 ची लोकसभा निवडणूक आहे.
अशावेळी खरं तर घरच्या अनुभवी माणसांचं ऐकायला पाहिजे.
कबूल; पण युवराजांना तेही वापरायचं नसेल तर?
त्यांना त्यांच्या पद्धतीने जाऊन बघू द्या. नाही तरी काय? लगेच 24 साली थोडंच त्यांना गादीवर बसायला मिळणार आहे?
गादीबिदी सोडाच! कडेला अंग चोरून बसायला छोटी वळकटी तरी मिळते की नाही, हा प्रश्न आहे.
म्हणजे?
वाघाचे पंजे. कुत्र्याचे कान. सोड माझी मान.
भले बाबुराव, तुम्ही आता अगदी त्यांच्यासारखंच बोलायला लागलात की! तोंडाला यील ते!
नाविलाज आहे. मुख्य विरोधी पक्ष म्हणून टिकण्याचीसुद्धा वानवा आहे. तरी यांना नुसते आकडे टाकायचे सुचताहेत. मग काय करावं?
तुम्ही प्रशांत किशोर नसलात, तरी सल्ला द्यायला बंदी नाहीये तुम्हाला. आपल्या देशात कोणीही, कोणालाही, कशावरूनही सल्ला देऊ शकतोच बरं का!
असं म्हणता? मग घ्या. बापहो, नुसते अंक टाकून सनसनाटी माजवत बसू नका. नाहीतर पक्षाचा राजकीय अंक संपायला आता फार वेळ लागणार नाही. ठरवा एकदाचं, अंक मोजायचे की अंक संपवायचा?
-झटका