

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दर्शना पवार खून खटल्यानंतर सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून महिलेवर कोयत्याने वार केल्याची घटना ताजी असतानाच प्रेमास नकार दिल्यानंतर आयटी इंजिनिअर असलेल्या महिलेच्या डोक्यात दांडक्याने मारहाण करून तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार 12 जुलै रोजी कोरेगाव पार्क परिसरात घडला. कोरेगाव पार्क पोलिसांनी हल्लेखोराला तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत.
संकेत शहाजी म्हस्के (रा. गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 37 वर्षीय महिलेने फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत हा महिलेचा मित्र असून, दोघेही एकाच परिसरात राहायला आहेत. मागील काही दिवसांपासून ती त्याच्यासोबत बोलत नव्हती. त्याच रागातून संकेतने 12 जुलैला तिला बर्निंग घाट परिसरात गाठले.
'तू मला भेटत का नाही, माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझी होऊ शकत नाही, तर कोणाचीही होऊ देणार नाही,' असे म्हणत शिवीगाळ केली. तिने त्याला माझे तुझ्यावर प्रेम नाही, असे म्हटल्यावर आरोपीने दांडक्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. हातावर, पायावर मारहाणीमुळे महिला खाली पडल्यानंतरही संकेतने तिच्या डोक्यात दांडक्याने मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक महेश वराळ तपास करीत आहेत.
हल्ला झालेल्या महिलेचा पहिला विवाह झाला असून, तिचा पतीपासून घटस्फोट झाला आहे. ती सध्या युआन आयटी पार्क येथे बिलिंग विभागात नोकरीस होती. याच दरम्यान तिची संकेत याच्याबरोबर ओळख झाली. परंतु, घटस्फोटित पतीही तिच्या संपर्कात आला होता. मागील महिन्यापासून संकेत हा तिला प्रेम असल्याचे सांगत होता. मात्र, घटनेच्या दिवशी तिने त्याला पती पुन्हा संपर्कात आल्याचे कारण सांगत त्याच्या प्रेमास नकार दिला. त्यानंतर संकेतने तिच्यावर हल्ला केला. या वेळी तिचा दुसरा मित्र प्रशांत सदगुणु आल्यानंतर संकेत पळून गेला. दरम्यान, त्याला पोलिसांनी अटक केली.
हेही वाचा