

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोणतीही कारवाई किंवा चौकशी लागली की, हसन मुश्रीफ जाती-धर्माचा आधार घेतात. तुम्ही निर्दोष आहात ना, मग जाती-धर्माच्या मागे का लपता? असा खडा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी आ. हसन मुश्रीफ यांना केला. ते शनिवारी पत्रकारांशी बोलत होते.
आ. मुश्रीफ यांच्या घरावर 'ईडी'ने टाकलेल्या छाप्यानंतर मुश्रीफ यांनी समरजित घाटगे यांच्यावर आरोप केला होता. त्याला उत्तर देताना घाटगे यांनी, आपल्याला कुणाच्या मागे लपण्याची गरज नाही. जो वार करायचा तो मी समोरून करतो. पाठीत खंजीर खुपसायचे तुमच्यासारखे संस्कार माझ्यावर नाहीत, असे सांगितले.
आरोप होताच किंवा छापा पडताच मुश्रीफांची स्क्रीप्ट ठरलेली असते. प्रथम कारवाईमागे समरजित घाटगे असल्याचा आरोप करतात. नंतर कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करायचे; त्यानंतर कार्यकर्त्यांनी कागल बंद करायचे; मग संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिलांना पुढे करून शेवटी हत्तीवरून मिरवणूक काढू, असे सांगायचे, हे ठरलेले असते. 2019, 2021 आणि आता पडलेला 'ईडी'चा छापा यावेळी हे दिसून आल्याचे घाटगे म्हणाले.
राज्यातील सत्ताबदलावेळी मुश्रीफ यांनी आपल्याला उद्देशून वाघाचे काळीज असेल, पुरुषार्थ व मर्दानगी असेल, तर माझ्यापेक्षा जास्त काम करून दाखवा, असे आव्हान दिले होते. आता त्यांच्याच भाषेत आपण त्यांना प्रतिआव्हान देतो की, वाघाचे काळीज असेल आणि पुरुषार्थ व मर्दानगी असेल, तर तुम्हाला जात-धर्माच्या मागे लपण्याची आवश्यकता का वाटते? निर्दोष असाल, तर तुमच्यावरील आरोपांना कायदेशीर उत्तरे द्या. जात-धर्माच्या मागे लपू नका. ज्याच्या मनात खोट असते तो जातीच्या आड लपतो. तो खरा जातीयवादी असतो. हे त्यांनी स्वतः सिद्ध केले. पुरोगामी कागलमधील ते खर्या अर्थाने जातीयवादी आहेत. राजर्षी शाहू महाराज यांच्या रक्ताचा मी वारस आहे. स्वर्गीय विक्रमसिंहराजे यांचा मुलगा आहे. मुश्रीफांसारखी पाठीर खंजीर खुपसण्याची माझी संस्कृती नाही. मला कुणाच्या कामाचे श्रेय घ्यायचे नाही, कुणाच्या मागे लपून काम करायचे नाही. योग्य वेळ आली की, पुराव्यांसह छाती ठोकून जाहीर आरोप करेन.
मलिकांबाबत एवढे प्रेम का?
मुश्रीफांनी प्रसारित केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी स्वतःला नवाब मलिकांच्या रांगेत बसवले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर कारवाई झाली. त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र, हे नेते राजकीय सुडातून कारवाई असल्याचे सांगतात; पण कोणीही नवाब मलिक यांची पाठराखण करत नाहीत. कारण, नवाब मलिकांवर भ—ष्टाचाराचे नाही; तर दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. मुश्रीफांना हे माहिती नाही का? 'टेरर लिंक' हा शब्द मुश्रीफांना माहीत नाही का? मग मलिकांवर मुश्रीफांचे एवढे प्रेम का? याचीही चौकशी झाली पाहिजे, असेही घाटगे म्हणाले.
त्यांना स्वप्नातही घाटगे दिसतात
घाटगे म्हणाले, कोणताही आरोप झाला की, ते माझे आणि माझ्या कार्यकर्त्यांचे नाव घेतात. माझे नाव घेतल्याशिवाय 25 वर्षे आमदार असणार्या मुश्रीफांची बातमी छापून येत नाही. त्यांना आता स्वप्नातही आम्हीच दिसतो. मुश्रीफ यांना प्रत्येक ठिकाणी मी दिसत आहे. एवढेच नाही, तर माझे कार्यकर्तेही दिसत आहेत. ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. 2024 मध्ये कोणाला सहानुभूती आहे हे कळेल, असेही ते म्हणाले.