Yoga  Day 2023 : योगविद्येचे अध्वर्यु

Yoga Day 2023 : योगविद्येचे अध्वर्यु

Published on

तन-मनाच्या आरोग्यापासून ते आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च ध्येयापर्यंत अनेक गोष्टी साध्य करून देणार्‍या योगविद्येचे प्राचीन काळापासूनच अत्यंत महत्त्व सांगितलेले आहे. अर्वाचीन काळात भारतातील अनेक ऋषितुल्य योगगुरूंनी योगविद्येचे महत्त्व लोकांना समजावून सांगितले. एतद्देशीय लोकांपासून ते परदेशातील लोकांपर्यंत अनेकांनी त्यांचे अनुयायीत्व स्वीकारून योगविद्येला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान दिले. अशा काही योगगुरूंची 'आंतरराष्ट्रीय योग दिना'च्या निमित्ताने ही माहिती… (Yoga Day 2023 )

तिरुमलाई कृष्णमाचार्य : आधुनिक योगपरंपरेचे जनक म्हणून तिरुमलाई ऊर्फ टी. कृष्णमाचार्य यांना ओळखले जाते. ते एक प्रख्यात योगगुरू व आयुर्वेदाचे तज्ज्ञ होते. 18 नोव्हेंबर 1888 मध्ये कर्नाटकात त्यांचा जन्म झाला. पारंपरिक हठयोगामध्ये श्वास आणि क्रियांचा मिलाफ घडवून त्यांनी 'विन्यास योगा'ची पद्धत विकसित केली. महर्षी पतंजलींच्या योगसूत्रांवर आधारित त्यांची शिकवण असे. त्यांनी देश-विदेशात अनेक निष्णात योगगुरू निर्माण केले. (Yoga Day 2023 )

स्वामी शिवानंद सरस्वती : तामिळनाडूमध्ये जन्मलेले स्वामी शिवानंद सरस्वती हे पूर्वाश्रमी एक प्रसिद्ध डॉक्टर होते व परदेशातही त्यांनी वैद्यकीय सेवा केली होती. वयाच्या चाळीसाव्या वर्षी ते ऋषीकेशला आले व त्यांनी योग-ध्यान मार्गाने स्वतःचे पारमार्थिक ध्येय गाठले. कालांतराने त्यांनी ऋषीकेशला शिवानंद आश्रमाची स्थापना केली व दिगंत ख्याती असलेले अनेक शिष्य घडवले. त्यांनी कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आणि राजयोगाचा सुंदर मिलाफ घडवला होता.

बी.के.एस. अय्यंगार : 'अय्यंगार योग'चे हे जगद्विख्यात संस्थापक. लहानपणी आजारामुळे शरीर अशक्त झाल्यावर त्यांनी योगमार्ग स्वीकारला. त्यांचे जवळचे नातेवाईक असलेल्या टी. कृष्णमाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी योगाचे धडे गिरवले आणि कालांतराने पाश्चात्त्य देशांमध्ये हठयोगाचा प्रसार केला. त्यांनी योगविद्येला एक नवे स्वरूप दिले ज्याला आज 'अय्यंगार योग' म्हणून ओळखले जाते.

स्वामी कुवलयानंद : यांचा जन्म 30 ऑगस्ट 1883 मध्ये झाला. त्यांनी योगविद्येबाबत मोठेच संशोधन केले होते. ते स्वतः एक योगगुरूही होते. योगासनांचे शरीरावरील परिणाम ते वैज्ञानिक मार्गाने तपासून पाहत. त्यांनी अशाच कार्यासाठी 'योग मिमांसा' नावाचे नियतकालिकही सुरू केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news