राज्यभर यलो अलर्ट; आज ताशी 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता

राज्यभर यलो अलर्ट; आज ताशी 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता
Published on
Updated on

मुंबई/पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसासह 30 ते 40 कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने राज्यात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मान्सूनची राज्यातील आगेकूच सुरूच आहे. पोषक वातावरणामुळे मान्सून पुढील 24 ते 48 तासांत मुंबईसह राज्याच्या उर्वरित भागात प्रवेश करण्याची चिन्हे आहेत. मुंबई-कोकण, मध्य महाराष्ट्र, तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. हा पाऊस 16 जूनपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातकडे सरकले असले तरी सोमवारी 12 जून रोजी वार्‍याचा वेग वाढला होता. मंगळवारी वार्‍याचा हा वेग 50 कि.मी.वरही जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळामुळे दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रसह किनारपट्टी भागात हलका पाऊस होईल. दरम्यान, राज्यातील काही भागांतील कमाल तापमानाचा पारा कमी होण्याची शक्यता आहे. सोमवारी वर्धा येथे राज्यातील सर्वाधिक म्हणजेच 43.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र, उर्वरित शहरांचा कमाल तापमानाचा पारा 40 अंशांच्या आसपास आहे.

बिपरजॉयचा मुंबईला धोका नाही

गुजरातच्या दिशेने सरकल्याने मुंबईला बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका नाही. मुंबईच्या समुद्रकिनार्‍यापासून सुमारे 600 किलोमीटर दूरवरून हे वादळ पुढे सरकले. यामुळे दोन दिवस शहराच्या किनारपट्टीलगत भागाला जोरदार वार्‍याने झोडपले. मात्र यात मोठे नुकसान झाले नसल्याचे आपत्कालीन विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news