

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील रुग्णांवर उपचार करणे सोडून, योग वर्गात डॉक्टर व परिचारिका व्यस्त असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या बेशिस्त डॉक्टर (वैद्यकीय अधिकारी), परिचारिका (स्टार्फ नर्स), लिपिक, सहायक भांडारपाल, शिपाई अशा आठ जणींवर कारवाई करीत आयुक्त शेखर सिंह यांनी एकूण 1 लाख 10 हजार 220 रुपयांचा दंड केला आहे.
वायसीएम रुग्णालयात पिंपरी-चिंचवड, पुणे, जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. या रुग्णांवर उपचार करणे सोडून डॉक्टर, परिचारिका, लिपिक व शिपाई हे कर्मचारी रुग्णालयातील एका हॉलमध्ये दररोज दोन तास योगा करत होते. रुग्णांकडे लक्ष देणे सोडून डॉक्टर व परिचारिका योगा करण्यात व्यस्त असल्याने संतप्त झालेल्या एका नातेवाइकांनी आयुक्तांकडे तक्रार केली होती.
पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या पथकाने वायसीएम रुग्णालयामध्ये अचानक भेट देत तपासणी केली. त्या वेळी हे डॉक्टर व परिचारिका हॉलमध्ये योगा करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार प्रशासनाने रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याकडून माहिती मागवली. त्यामध्ये त्यांनी अशा प्रकारे कामाच्या वेळी योगा प्रशिक्षण घेण्यास कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचे उत्तर दिले आहे. तसेच, संबंधित डॉक्टर व कर्मचार्यांना लेखी खुलासा करण्यास सांगितले. खुलासा संयुक्तिक नसल्याने प्रशासन विभागाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.
डॉक्टर व कर्मचार्यांना असलेला वेतनाची तासानुसार विभागणी करण्यात करून दोन महिन्यांतील प्रत्येकी दोन तास योगा केल्याने त्यानुसार वेतन कापण्याचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत. तसेच, या प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाही, त्याची दक्षता घेण्याचे आदेश आयुक्तांनी डॉ. वाबळे यांना दिले आहेत.
वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा जावळे यांना 53 हजार 356 रुपये दंड करण्यात आला आहे. ग्रंथपाल कम लिपिक प्रतिभा मुनावत यांना 22 हजार 32, लिपिक सुषमा जाधव यांना 10 हजार 432, सहायक भांडारपाल कविता बहोत यांना 11 हजार 904, शिपाई शमलता तारू यांना 11 हजार 896 इतका दंड करण्यात आला आहे. स्टाफ नर्स असलेल्या सविता ढोकले, नूतन मोरे व नीलिमा झगडे यांनी ड्युटी संपल्यानंतर रुग्णालयात योगा केल्याने त्यांना प्रत्येकी 200 रुपये दंड आकारला आहे. हा दंड वेतनातून कापला जाणार आहे.
एका रुग्णांवर डॉक्टर व परिचारिका उपचार करत नव्हत्या. त्यासंदर्भात रुग्णांच्या नातेवाइकांनी संबंधित डॉक्टर व परिचारिका यांना विनंती केली. मात्र, त्यांनी योगा क्लास असल्याचे कारण देत आता रुग्णास तपासता येत नसल्याचे कारण दिले. त्यामुळे संतापलेल्या नातेवाइकांनी या प्रकाराची तक्रार आयुक्त व सामान्य प्रशासन विभागाकडे केली आणि या क्लासचे बिंग फुटले.
सहायक आयुक्त प्रशांत जोशी व बाळासाहेब खांडेकर हे दीर्घ रजेवर आहेत. रजा संपल्यानंतर कामावर तात्काळ रूजू न झाल्याने या दोन अधिकार्यांना आयुक्त शेखर सिंह यांनी बुधवारी (दि.24) नोटीस बजावली आहे. चोवीस तासांच्या आत कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, त्याबाबतचा खुलासा मागितला आहे. समाधानकारक खुलासा न केल्यास कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.