जागतिक पर्यटन दिन विशेष : कोल्हापुरात ‘पर्यटन हब’ची क्षमता

जागतिक पर्यटन दिन विशेष : कोल्हापुरात ‘पर्यटन हब’ची क्षमता
Published on
Updated on

कोल्हापूर, अनिल देशमुख : साडेतीन शक्तिपीठापैकी एक, दक्षिण काशी म्हणून संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध असणार्‍या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या स्पर्शाने पावन झालेल्या आणि आजही शाबूत असलेल्या वास्तू पन्हाळा, लोकराजा राजर्षी शाहूंच्या इतिहासाची पदोपदी साक्ष देणार्‍या अनेक वास्तू शहराच्या मध्यभागी आहेत. अशा ऐतिहासिक वास्तू शहरात असणारे कोल्हापूर हे राज्यातील बहुदा एकमेव शहर असावे.

मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर अशी ओळख असणारे कलाप्रेमी कोल्हापूर, यामुळे राज्यात दोनच ठिकाणी शासकीय चित्रनगरी उभारली. त्यापैकी एक कोल्हापुरात आहे. सांस्कृतिक परंपरेसह कोल्हापूरची क्रीडा परंपरा संपूर्ण देशाला परिचित आहे. याखेरीज कोल्हापूरची खाद्यसंस्कृती पर्यटन विकासाचे प्रमुख केंद्र ठरणारी आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला हा जिल्हा जल-वन-कृषी पर्यटनासाठी समृद्ध आहे. मात्र जिल्ह्याचा नियोजनबद्ध पर्यटन विकास होण्याची गरज आहे.

जिल्ह्यात तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, त्यानंतर सतेज पाटील, तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई, सध्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पर्यटन विकासासाठी प्रयत्न केले. सध्या जिल्हाधिकारी रेखावार यांनी पर्यटन विकासासाठी सातत्याने प्रयत्न होतील, असा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, अधिकारी बदलले की सर्व प्रयत्न थांबतात. यामुळे आजअखेर जिल्ह्याचा सर्वंकष पर्यटन विकासाचा आराखडा तयार झालेला नाही. यामुळे क्षमता असूनही पर्यटन विकास रखडलेलाच आहे.

कोल्हापूरचे भौगोलिक महत्त्व

कोल्हापूर हे कोकण, गोवा आणि कर्नाटकच्या मध्यावरील प्रमुख व्यापारी, औद्योगिक, सांस्कृतिक शहर आहे. कोल्हापुरातून दोन महामार्ग गेले आहेत. मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, धनबाद, नागपूर, तिरुपती, कलबुर्गी अशा प्रमुख शहरांशी कोल्हापूर रेल्वेमार्गाने जोडले आहे. मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, तिरुपती, बंगळूर अशा प्रमुख शहरांशी हवाई सेेवेने कोल्हापूर जोडले आहे. कोल्हापूरचा विमानतळ वेगाने विकसित होत आहे. सर्व ऋतूंत उत्तम हवामान असणार्‍या शहरापैकी एक शहर अशीही कोल्हापूरची ओळख आहे. निवासासाठी लहान-मोठी सहाशेहून अधिक हॉटेल, यात्री निवास व 24 तास दळणवळणाची सुविधा आहे.

काय करायला हवे

कोल्हापुरातील प्रत्येक गोष्ट पर्यटनाच्याद़ृष्टीने महत्त्वाची आहे. त्याचे मार्केटिंग व्हायला हवे, उदा. पहिला डॉ. आंबेडकराचा पुतळा, शाहूंचा पुतळा, पहिला कॅमेरा, समुद्रदेवतेचा पुतळा, साठमारी आदी. योग्य मार्केटिंग झाले, त्यानुसार या ठिकाणांना प्रमोट केले, तर पर्यटकांचा ओघ लागू शकतो. जिल्ह्याचे पर्यटन विकासाचे स्वतंत्र धोरण तयार करता आले, त्यानुसार आराखडा तयार करता आला तर तसे प्रयत्न झाले पाहिजे. आराखडा असा असावा की त्याची सातत्याने अंमलबजावणी करणे राज्य शासनाचे स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासन यांना बंधनकारकच असले पाहिजे.

जिल्ह्यातील नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, विक्रेते, वाहनधारक आदी सर्वांतच 'अतिथी देवो भवो' अशा पद्धतीची संस्कृती आणखी व्यापक प्रमाणात रुजली पाहिजे. पर्यटन विकासाबाबत योगदान द्यायचे आहे, ही भावना वेगवेगळ्या माध्यमातून रुजवली पाहिजे.

विविध अभ्यासक्रम, प्रशिक्षण, मार्गदर्शन शिबिरे आदी माध्यमातून पर्यटन विकासाचे महत्व पटवून दिले पाहिजे. जनजागृती, विविध यंत्रणाद्वारे पर्यटन विकासाचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे. जिल्हा नियोजन समिती, आमदार आणि खासदार निधी यातील ठराविक निधी पर्यटन विकासासाठी दरवर्षी खर्च केला पाहिजे.

ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्राचा समृद्ध वारसा लाभलेल्या कोल्हापुरात 'पर्यटन हब'ची प्रचंड क्षमता आहे. याकरिता नियोजबद्ध प्रयत्नांची गरज आहे. तसे प्रयत्न झाले तर कोल्हापूर हे भविष्यात देशातील प्रमुख टुरिझम सेंटरपैकी एक ठरू शकते. यामुळे जगाच्या पर्यटन नकाशावरही कोल्हापूरला महत्त्वाचे स्थान निर्माण होईल. त्याचप्रमाणे निसर्गसौंदर्य, इतिहासाचा अमूल्य ठेवा आणि विविधतेने नटलेले कोल्हापुरातील पर्यटन वैभव देशासह जगभरातील पर्यटकांना खुणावत आहे. कर्नाटक व कोकणाशी जोडणारे नाते, जवळच गोवा असल्याने मध्यवर्ती ठिकाण आहे. रस्ते, विमान दळणवळणाची कनेक्टिव्हिटी असलेल्या कोल्हापुरात केरळच्या धर्तीवर 'ट्रॅव्हल मार्ट' झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास होईल. राज्य सरकारकडून पर्यटनवाढीसाठी बूस्टर मिळाल्यास पूरक व्यवसायांना मोठा हातभार लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news