

मॉस्को/बंगळूर, वृत्तसंस्था : रशियाचे 'लुना-25' हे अंतराळयान अखेर कोसळले आहे. भारताच्या आधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या इराद्याने भारतापाठोपाठ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मोहिमेसाठी निघालेल्या रशियाच्या या यानात तांत्रिक बिघाड झाला. आधी 'लुना-25' चे कक्षांतर हुकल्याचे रॉसकॉसमॉस या रशियन अंतराळ संस्थेकडून सांगण्यात आले होते.
'लुना-25' ला चंद्रावर उतरण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या चंद्राच्या कक्षेत पाठवताना आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. कक्षा बदलताना अचानक बिघाड झाल्याने कक्षांतर अपेक्षित पद्धतीने होऊ शकले नाही, असेही या अंतराळ संस्थेने स्पष्ट केले होते. 'लुना-25' सोमवारी (21 ऑगस्ट) चंद्रावर उतरणे अपेक्षित होते.
चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात आजवर केवळ रशिया, चीन आणि अमेरिका या तीनच देशांना यश आलेले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आजवर कोणत्याही देशाने सॉफ्ट लँडिंगचे धाडस केलेले नाही. भारताचे 'चांद्रयान-3' चंद्राच्या दक्षिण ध्रुवासाठी आधी निघाल्याने मोहीम फत्ते झाल्यास भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरेल, हे निश्चित होते.
'लुना-25' कसे कोसळले?
'लुना-25' च्या नियोजित कार्यक्रमानुसार, अंतराळ यानाला प्री-लँडिंग कक्षेत (म्हणजे जेथून चंद्रावर उतरायचे अशा कक्षेत) 18 कि.मी. बाय 100 कि.मी.) प्रवेश करण्याची कमांड देण्यात आली. त्यासाठी ठरल्याप्रमाणे ताकदीने थ्रस्टर फायर होऊ शकले नाही. तोल गेला आणि यान कोसळले.
'चांद्रयान-3' लँडर चंद्रापासून फार जवळ
'चांद्रयान-3' ने आतापर्यंत चंद्रावर 4 कक्षांतरे पूर्ण केली आहेत. आता 'चांद्रयान-3' तील प्रॉपल्शन मॉड्यूल व लँडर-रोव्हर परस्परांपासून वेगळे होऊन त्यांचा स्वतंत्रपणे प्रवास सुरू आहे. प्रॉपल्शन पुढेही चंद्राच्या कक्षेतच फिरणार आहे, तर लँडर-रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठीचा प्रवास सुरू केला आहे. आता लँडर-रोव्हर चंद्राच्या 113 कि.मी. बाय 157 कि.मी. कक्षेत आहे.