लोकसभेच्या सर्व ४८ जागा जिंकणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकसभेच्या सर्व ४८ जागा जिंकणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सर्वाधिक खासदार असणारे उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरेल. राज्यातील सर्व 48 जागा महायुती एकत्र लढवेल आणि जिंकेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी व्यक्त केला. निवडणुकीत कोण उमेदवार आहे, हे महत्त्वाचे नाही. सर्व जागांवर नरेंद्र मोदी हेच उमेदवार असल्याचे समजून आतापासूनच कमाला लागा, असे आवाहनही त्यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) पहिलीच संयुक्त आढावा बैठक वरळी येथे झाली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा करून मार्ग काढला जाईल; पण, उमेदवार कोणाचाही असला, तरी नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत, असे समजून एकजुटीने काम करावे. महायुतीने आपली ताकद एक केली, तर 48 जागा जिंकणे अवघड नाही. 'इंडिया' आघाडीला दोन दिवसांच्या बैठकीतून साधा लोगो निश्चित करता आला नाही, तर ते आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार काय ठरविणार? असा टोला शिंदे यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका

'इंडिया' आघाडीच्या दोन दिवसांच्या बैठकीने मुंबईतील हवा प्रदूषित झाली आहे. सर्व भ्रष्ट पक्ष आणि नेते या आघाडीत एकत्र आले आहेत. ज्यांनी आपल्या हयातीत फक्त भ्रष्टाचार केला ते मोदी यांच्यासारख्या निष्कलंक नेतृत्वाला हटवायला निघाले आहेत. मात्र, त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी हल्ला चढविला. उद्धव ठाकरे हेदेखील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले आहेत. तेथे जाऊन घरातून कारभार करणार की फेसबुक लाईव्ह करणार? असा खोचक सवाल त्यांनी केला.

'इंडिया' आघाडीची 'भेंडी' झाली : देवेंद्र फडणवीस

महायुतीतील पक्षांत आणि आमच्यात 100 टक्के समन्वय आहे. मुख्यमंत्री, मी व अजित पवार आमच्यात पूर्ण संवाद आहे. आम्ही एकत्रित मिळून निर्णय घेतो आणि एका विचाराने पुढे चाललो आहोत. महायुतीत 'इंडिया' आघाडीसारखी स्थिती नाही. आमचे सर्व मित्रपक्ष फेव्हिकॉलचा जोड आहेत, तुटणार नाही. 'इंडिया' आघाडीची 'भेंडी' आघाडी झाली आहे. 'इंडिया'च्या बैठकीतून बसायला खुर्ची न मिळाल्याने ममता बॅनर्जी निघून गेल्या. 'इंडिया' आघाडीने आज जे निवेदन जारी केले आहे त्यात शक्य तेथे एकत्र निवडणूक लढवू, असे म्हणतात. म्हणजे ते एकत्र येतील, असे सांगता येत नाही. आपण मात्र 100 टक्के महायुतीत लढणार आहोत. आपला एकच उमेदवार आहे, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, असेही फडणवीस म्हणाले.

राजकीय अस्पृश्यता संपविण्याची गरज : अजित पवार

महायुतीच्या बैठकीनंतर उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीतील बहुतांश नेत्यांच्या चर्चा केल्यानंतर महायुतीत व सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. विकासासाठी एकत्र आले पाहिजे आणि राजकारणातील अस्पृश्यता संपविली पाहिजे. यापुढील काळात अनावश्यक एकमेकांविरोधात संघर्ष टाळला पाहिजे. महायुतीत कोणताही वाद नाही. आम्हा नेत्यांतही उत्तम समन्वय आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रफुल्ल पटेल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, चंद्रकांत पाटील, रासपचे महादेव जानकर, जनसुराज्यचे विनय कोरे, अविनाश महातेकर, रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news