

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुख उपस्थित होते. राज्याबाहेर शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी संघटना बळकट करण्यासाठी राज्यप्रमुखांच्या कामाचा आढावा घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले. काश्मिर भेटीवर असताना उत्तर भारतातील शिवसेनेच्या राज्यप्रमुखांची भेट घेतली. तेव्हा पक्षाचा मुख्य नेता आपल्याला भेटायला आल्याने ते राज्यप्रमुखही चकीत झाले होते, असे शिंदे यावेळी म्हणाले.
काश्मिरमधील कलम ३७० हटावे, हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी करून दाखविले. ज्यांनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा विडा उचलला आहे त्याच भाजपसोबत आज आपण आहोत याचा अभिमान आहे. नागरिक युतीकडे आशेने पहात आहेत. संघटना बलवान करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आपण घेतलेले निर्णय, योजना नागरिकांपर्यंत तळागाळात पोहचवा, असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत केले. बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचार देशाच्या कानाकोपर्यात नेऊन पुढे काम करण्याचा ठरावही या बैठकीत मंजूर करण्यात आला.
युतीतील वाद सोडविण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांची समिती
युतीत मिठाचा खडा पडू नये याची भाजप शिवसेनेकडून काळजी घेतली जाणार आहे. विविध मतदारसंघातील भाजप-शिवसेनेतील अंतर्गत वाद संपविण्यासाठी तसेच भविष्यात वाद होऊ नये यासाठी दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांची समिती बनवली जाणार आहे. तसेच, राज्य व जिल्हा पातळीवरील सर्वच निवडणुका युतीत लढणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीत स्पष्ट केले. तसेच लवकरच शिवसेना-भाजप युतीचा मेळावा होणार असल्याचेही ते म्हणाले.
.हेही वाचा