

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रत्येक देशापुढे आपापली आव्हाने असतात, परंतु राष्ट्रीय सुरक्षेइतके महत्त्वपूर्ण असे कोणतेही आव्हान नसते. भारत आपली ताबारेषा कोणालाही कधीही ओलांडू देणार नाही, असे रोखठोक मत परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी पुण्यात व्यक्त केले. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातर्फे आयोजित 'जी 20 फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स' या व्याख्यानमालेत डॉ. जयशंकर बोलत होते. या वेळी सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. जयशंकर म्हणाले की, जगाला देशाचे वैविध्य दाखवण्यासाठी जी-20 परिषद ही सर्वांत मोठी संधी आहे. जी-20 देशांच्या भारताकडून अपेक्षाही मोठ्या आहेत. जी- 20 हा केवळ वीस देशांचा समूह नाही, तर या परिषदेचे अध्यक्षपदही भारतासाठी जागतिक राजकारणातील मोठी संधी आहे. आपण केवळ आपल्या हक्कांसाठी बोलत आहोत असे नाही, तर जगाच्या दक्षिण भागाचा आपण आवाज आहोत. भारताचा जगात आता डिजिटल चेहरा निर्माण झाला आहे.
पुणे देशाचे हृदय..
कोविडनंतर आपण जगात वेगाने पुढे जाणारा देश म्हणून प्रगती करीत आहोत. त्यासाठी उत्पादन करणारी शहरे तयार झाली पाहिजेत, माझ्या दृष्टीने पुणे आपल्या देशाचे उत्पादनातील हृदय आहे. इथे ज्या प्रकारे उद्योजकता उदयाला आली तशी अनेक शहरे भारतात तयार करावी लागतील.
रशिया-युक्रेन संघर्षाबाबत
डॉ. जयशंकर म्हणाले की, सध्या जग अत्यंत कठीण अवस्थेत आहे. गेल्या वर्षभरात या संघर्षाचे परिणाम जगाने अनुभवले आहेत. ऊर्जा आणि अन्नसंकट हे दुपटीने वाढले आहे. सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांनी प्रास्ताविक केले. कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते यांनी आभार मानले. सिंबायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजच्या संचालिका प्रा. शिवली लवळे यांनी सूत्रसंचालन केले.