

नवी दिल्ली : लोखंडी वस्तू कालांतराने गंजतात हे आपण नेहमी पाहत असतो. मात्र, रेल्वेमार्गाचे रूळदेखील लोखंडाचेच असतात; पण त्यांना गंज चढत नाही, असे का? याचा कधी विचार केला आहे का? महत्त्वाचे म्हणजे रेल्वे रूळांना नेहमीच पाऊस, सूर्यप्रकाश आणि अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो; पण तुमच्या मनात कधी प्रश्न आला आहे का की इतका वारा, ऊन आणि पाणी असतानाही या ट्रॅक्सना (Railway track) गंज का लागत नाही? चला तर मग आज जाणून घेऊया रेल्वे ट्रॅकला गंज का नाही…
रेल्वे रूळांना गंज (Railway track) का पडत नाही हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम लोखंडाला गंज का आणि कसा पडतो हे जाणून घेणे आवश्यक आहे. लोखंड हा मजबूत धातू आहे; पण त्याला गंज लागल्यावर त्याचा काही उपयोग होत नाही. जेव्हा लोह किंवा लोखंडापासून बनवलेले पदार्थ ऑक्सिजन आणि आर्द्रतेच्या संपर्कात येतात तेव्हा ते त्यांच्याशी प्रतिक्रिया करून अवांछित संयुगे तयार करतात आणि हळूहळू खराब होऊ लागतात. 'गंज' म्हणजे रासायनिकद़ृष्ट्या 'हायड्रेटेड आयर्न ऑक्साईड' हे संयुग. यामुळे लोखंडाचा रंगही बदलतो. आता प्रश्न असा आहे की रेल्वे रूळांवर गंज का नाही? रूळावरील चाकांच्या घर्षण शक्तीमुळे गंज येत नाही असे अनेकांना वाटेल; पण तसे नाही.
रेल्वे ट्रॅक बनवण्यासाठी खास प्रकारचे स्टील (Railway track) वापरले जाते. पोलाद आणि मिश्र धातू मिसळून ट्रेनचे ट्रॅक तयार केले जातात. स्टील आणि मँगलोय यांच्या या मिश्रणाला मँगेनीज स्टील म्हणतात. यामुळे, ऑक्सिडेशन होत नाही आणि अनेक वर्षे गंजत नाही. रेल्वे रूळ सामान्य लोखंडाचे असते तर काय झाले असते? असे असते तर हवेतील आर्द्रतेमुळे लोखंडाला गंजण्याची शक्यता असते. यामुळे वारंवार ट्रॅक बदलावे लागतील आणि त्याचवेळी रेल्वे अपघाताचा धोका निर्माण होईल. त्यामुळे या ट्रॅकच्या बांधकामात रेल्वे विशेष प्रकारचे साहित्य वापरते.