

नवी दिल्ली : बर्याच वेळा आपल्याला आपल्याच शरीराबाबत किंवा आपण ज्या ग्रहावर राहतो त्या ग्रहाबाबतच पुरेशी माहिती नसते! सध्या माणूस अंतराळातील अनेक ग्रह-तार्यांचा वेध घेऊ लागला आहे; पण आपल्याच ग्रहाविषयी अनेकांना माहिती नसते. पृथ्वी स्वत:भोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरत असते. विश्वास बसणार नाही; पण पृथ्वी स्वत:भोवती साधारण ताशी 1609 किलोमीटर इतक्या अतिप्रचंड वेगाने फिरते. आपल्याला मात्र याची जाणीवही होत नसावी; पण असं का आणि कसं शक्य आहे? यामागचे कारण जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का?
या विश्वात जे काही घडतं, त्यामागे काही शास्त्रीय कारणे दडलेली आहेत. त्यामागे विज्ञान आहे. पृथ्वीचे इतक्या वेगात फिरणे आणि आपल्याला ते न कळणे यामागेही विज्ञानच आहे. इथे एक बाब लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचे आहे की, कोणत्याही गोष्टीच्या वेगाबद्दल आपल्याला तेव्हाच जाणीव होते जेव्हा त्या वेगात बदल होतो. अगदी त्याचप्रमाणे पृथ्वी स्वत:भोवती फिरतेय खरी; पण तिच्या वेगात मात्र सातत्य आहे. याच कारणामुळे आपल्याला या वेगाची जाणीव होत नाही.
आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे महाकाय पृथ्वीचा आकार पाहता तिच्यापुढे जीवसृष्टीचा भाग असणारे आपण अगदीच लहानगे आहोत. त्यामुळे सूर्याभोवती फिरणे असो किंवा मग स्वत:भोवती फिरणे असो, आपल्याला पृथ्वीचा वेग लक्षात येत नाही. पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास साधारण 23 तास, 56 मिनिटे आणि 4 सेकंद इतका वेळ लागतो. पृथ्वीचा परिघ 40 हजार 75 किलोमीटरचा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भूमध्य रेषेजवळील भाग साधारण 1600 कि.मी. प्रतितास इतक्या अतिप्रचंड वेगाने फिरतो.