

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमध्ये राखीव असणार्या 25 टक्के जागांसाठीच्या प्रवेशप्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक गेल्यावर्षी 23 फेब्रुवारीला जाहीर झाले होते. यंदा या वेळापत्रकाबाबत शिक्षण विभागाकडून कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे वेळापत्रक नेमके कधी जाहीर होणार, असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत.
आरटीई प्रवेश प्रक्रियेत पहिल्यांदा मऑटो फॉरवर्डफ केलेल्या शाळांची आणि नवीन नोंदणी झालेल्या शाळांची पडताळणी करण्यात येते. ही प्रक्रिया वेळखाऊ असते. त्यामुळे वेळापत्रक जाहीर करून ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असते. मात्र, यंदा वेळापत्रकच जाहीर झाले नसल्यामुळे ही प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
त्यातच यापुढील प्रवेश प्रक्रिया कर्नाटक राज्यात ज्या पध्दतीने आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यातील काही तरतुदी आणि नव्याने काही समावेश केलेल्या तरतुदींच्या आधारे राबविण्याचा विचार सरकार करत आहे. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेत काही बदल होणार आहेत का, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेत काही बदल असल्यास ते जाहीर करावेत आणि संभाव्य वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी पालक करत आहेत.