

मुलगी वयात येते तेव्हा तिच्याबद्दल आई-वडील, विशेषत: आई खूप जागरूक असते. तिच्या वागण्याकडे, बोलण्याकडे तिचे बारीक लक्ष असते. अगदी तिच्या व्यक्तित्वात होणारा बदल समजून घेण्यासाठी अनेक मार्गदर्शक पुस्तके, तज्ज्ञ लोकांचा सल्ला वगैरे ती घेत असते. पण मुलगा वयात येतो तेव्हा त्याची कुणी काळजी घेताना दिसत नाही. उलट मुलाकडे काय लक्ष द्यायचे? अशी आपली भावना असते.
मुलगा वयात येतो तेव्हा त्याच्यातही शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात, याकडे आपण अतिशय जागरूकतेने पाहिले पाहिजे. या वयात मुलांचा आवाज फुटतो, त्यांना दाढी-मिशा येऊ लागतात. शारीरिक वाढ होत असते, उंची वेगाने वाढत असते. चेहर्यातही बदल होत असतो. आपल्यात होणार्या बदलाची जाणीव मुलांना होत असते. मनात अनेक संभ्रम असतात. त्याबद्दल कुणाशी बोलायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यातच या वयात कुतूहल वाढत असते. नेमके ते नको त्या गोष्टींचेच असते आणि त्या वयात त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळाले नाही, तर पुढील आयुष्यात ती भरकटण्याचा संभव असतो. या वयात काही मुले उद्धट होतात, त्यांना कुणाचे काही ऐकायचे नसते. प्रेमात पडणे, व्यसन लागणे या गोष्टी मुलांच्या द़ृष्टीने घातक असतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होऊ शकतो. म्हणूनच आता मुलगा मोठा झाला, त्याची काळजी मिटली, असा विचार करून त्याला हवे तसे वागण्याची परवानगी देऊ नका. त्याला त्याच्या जबाबदारीची कर्तव्याची जाणीव करून द्या.
मुले वयात येत असताना त्यांच्यात होणार्या मानसिक बदलांकडे विशेष लक्ष द्यावे लागते कारण या वयात मुलांना सामाजिकतेची नवी जाणीव होत असते. घरातील लोकांपेक्षा बाहेरचा मित्र परिवार अधिक जवळचा वाटत असतो. मित्रांच्या नादाने अनेक बर्यावाईट सवयी त्यांना लागण्याचा संभव असतो. वाईट सवयी लागल्या तर मुले आयुष्यातून उठतात. पण एखादी वाईट सवय लागली म्हणून त्याला तुम्ही झिडकारलेत, तर त्याला चांगले वळण लागणार नाहीच. उलट आपल्या आई-वडिलांना आपण नको आहोत, ही भावना त्यांच्या मनात घर करून राहील आणि मानसिकद़ृष्ट्या ती खचतील. मुलांचे हे वय असे असते की, ज्यात त्यांना आपण मोठे झाल्यासारखे आणि आता आपल्याला सगळे कळते, असे वाटत असते. लहान मुलाला सांगतो त्याप्रमाणे आपण त्याना जर काही गोष्टी सांगायला गेलो, तर ते त्यांना आवडत नाही. म्हणून एखाद्या मित्राप्रमाणे या मुलांना वागणूक द्यावी. त्यांच्याबरोबरचे नाते मार्गदर्शक आणि मित्रत्वाचे असावे. या वयातील समस्या जाणून घेण्याची परिपक्वता आई-वडील दोघांनीही दाखवायला हवी, तरच वयात येणार्या मुलांचे जीवन खर्या अर्थाने सावरले जाईल. या वयात मुलांना लैंगिक आकर्षणही वाटत असते आणि त्यातूनही त्यांचा पाय घसरण्याची शक्यता असते. म्हणूनच मुलांना अपमानास्पद वाटणार नाही, अशा तर्हेने त्यांच्यावर लक्ष ठेवा. त्यांच्या मनात लैंगिकतेविषयी काही प्रश्न असतील, तर न अवघडता त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्या. दुसरे असे की, मुलींशी कसे वागायचे याचेही शिक्षण मुलांना द्यायला हवे. आपण मुलींना आधुनिक होण्यास सांगतो; पण मुलांच्या मनातील पारंपरिक विचारांना तसेच गोंजारत बसतो. त्यांच्यातही आधुनिकता आणि मुलींबद्दल समानतेची, निखळ मैत्रीची भावना असायला हवी.