

पुढारी ऑनलाईन डेस्क : चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाबद्दल जगभरातून भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक होत आहे. दरम्यान, चंद्रावरील जवाहर पॉइंट ( Jawahar Point ) या नावावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकारण सुरू झाले आहे. भाजप नेते व प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी जवाहर पॉइंट नावावर X ( पूर्वीचे नाव ट्विटर) वरुन काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.२६) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) बंगळूरु येथील कार्यालयात जाऊन शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. तसेच पुढील मोहिमांसाठी त्यांना प्रोत्साहन दिले. चांद्रयान-३ चे विक्रम लँडर चंद्रावर ज्या भागात यशस्वीरित्या उतरले ते ठिकाण 'शिवशक्ती पॉइंट' म्हणून ओळखले जाईल, अशीही घोषणा त्यांनी केली. याशिवाय २३ ऑगस्ट हा यापुढे राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करण्याची घोषणाही त्यांनी केली.
भारताची पहिली चांद्रयान-1 ही चंद्र मोहीम २२ ऑक्टोबर २००८ रोजी रोजी PSLV रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आली. १४ नोव्हेंबर २००८ रोजी चांद्रयान-1 चंद्राच्या पृष्ठभागावर अवतरले होते. ज्या ठिकाणी चांद्रयान-१ चे लँडिंग झाले त्या ठिकाणाला जवाहर पॉइंट असे नाव देण्यात आले होते.
चांद्रयान-1 च्या क्रॅश लँडिंग साइटला जवाहर पॉईंट असे नाव देण्यात आले आहे. कारण चांद्रयान-1 चांद्र पृष्ठभागाला स्पर्श करणारा दिवस १४ नोव्हेंबर हाेता. हा दिवस हा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जयंती दिवस होता. याच दिवशी चांद्रयान-1चे चंद्रावर लँडिंग झाल्याने त्या भागाला जवाहर पॉइंट असे नाव देण्यात आले हाेते. हा निर्णय तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने घेतला होता.
चांद्रयान-१ च्या मदतीने भारताने प्रथम चंद्रावरील आपली मोहिम फत्ते केली होती. या मोहिमेद्वारे इस्रोने चंद्रावरील पाणी शोधले, जे अत्यंत महत्त्वाचे होते. चांद्रयान-1 ने ८ नोव्हेंबर २००८ रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आणि २९ ऑगस्ट २००९ रोजी त्याचा ऑर्बिटरशी संपर्क तुटला हाेता.
आता चांद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर जवाहर पॉइंटच्या नावावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकारण सुरू झाले आहे. भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी X (पूर्वीचे ट्विटर) यावर काँग्रेसवर निशाणा साधला. आहे. त्यांनी म्हटले आहे की, " आता देशात काँग्रेस नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असते आणि त्यांनी चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 पाठवले असते आणि त्यांना इंदिरा पॉइंट आणि राजीव पॉइंट असे नाव दिले असते."
हेही वाचा :