पत्रा चाळ घोटाळा आहे तरी काय?

पत्रा चाळ घोटाळा आहे तरी काय?
Published on
Updated on
– उदय तानपाठक

मुंबईच्या गोरेगावमध्ये सुमारे 50 एकर जमिनीवर दुसर्‍या महायुद्धात सैनिकांसाठी बराकी बांधल्या गेल्या. महायुद्ध संपल्यावर या बराकींमध्ये गरीब निम्न मध्यमवर्गीय कुटुंबे राहण्यास आली. 101 पत्र्याच्या बैठ्या चाळींमधून 627 भाडेकरू राहात होते. या चाळींचा पुनर्विकास करून तेथे 808 घरे बांधण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा युती सरकारच्या काळातील मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी चर्चेत आणला.

लोखंडवाला बिल्डरला हा प्रकल्प दिला गेला. मात्र त्याने ठरलेल्या 375 चौ. फूट घरांऐवजी 322 चौ. फुटांची घरे बांधली. त्यामुळे रहिवाशांनी बरीच आरडाओरड करून लोखंडवाला बिल्डरला बाहेर काढले. त्यानंतर 2007 मध्ये या चाळींच्या पुनर्विकासाचा विषय पुन्हा ऐरणीवर आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी म्हाडामार्फत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. म्हाडाने हे काम विपुल ठक्कर याच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले. करारानुसार गुरू आशिष कन्स्ट्रक्शन भाडेकरूंना 672 सदनिका देणार होती. उर्वरित जमिनीवरील 3000 सदनिका कंत्राटदाराला, म्हणजे गुरू आशिष कंपनीला विक्रीसाठी उपलब्ध होणार होत्या.

या कंपनीने हा प्रकल्प पूर्ण करण्यास असमर्थता दाखवल्यावर त्यात हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर (एचडीआयएल) या राकेश वाधवानच्या कंपनीची एन्ट्री झाली. एचडीआयएलने गुरू आशिष कंपनीवर ताबा मिळवून तिला एचडीआयएलची उपकंपनी केली. 2010 मध्ये गुरू आशिषचे एक भागीदार प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर्स एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 तसेच 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी विकासकांना हस्तांतरित करण्यात आले.

प्रवीण राऊत हा शिवसेना नेते संजय राऊत यांचा जवळचा मित्र. या प्रवीण राऊतने हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चरचे राकेश वाधवान, सारंग वाधवान व अन्य संचालकांना हाताशी धरले आणि या जमिनीवरील एफएसआय आठ बिल्डरांना 1034 कोटी रुपयांना विकून टाकला. हा मोठाच घोटाळा होता. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन आणि एचडीआयएल या घोटाळ्यात सामील होते. देशभरात गाजलेल्या पीएमसी बँक घोटाळ्यातही या कंपनीचा सहभाग आहे. कंपनीच्या संचालकाने म्हणजे राकेश वाधवानने या बँकेच्या अधिकार्‍यांच्या संगनमताने स्वत:च्या व कुटुंबीयांच्या नावे कर्ज घेतले. त्यानंतर कंपनीचा एनपीए काढण्यासाठी बँकेत 250 कोटी रुपयांची बनावट ठेव दाखवून बँकेने पुन्हा एनपीए कंपनी एचडीआयएलला नवीन कर्ज दिले.

संजय राऊत यांचा घोटाळ्याशी संबंध शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र प्रवीण राऊत यांच्यासह सारंग वाधवान, राकेश वाधवान हे या घोटाळेबाज एचडीआयएल कंपनीचे संचालक आहेत. यातील प्रवीण राऊत आणि सारंग वाधवान यांना दोन वर्षांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर त्यांची चौकशी झाली. तेव्हा संजय राऊत यांचे या प्रकरणातील कनेक्शन उघड झाले. पीएमसी बँक घोटाळ्यातही प्रवीण राऊत यांचा सहभाग असल्याचे पुढे आले. प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांना 55 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले होते. त्यातून संजय राऊत कुटुंबीयांनी दादरमध्ये आलिशान फ्लॅट घेतला. या संदर्भात ईडीने वर्षा आणि माधुरी राऊत यांचे जबाबही नोंदवले आहेत.

या घोटाळ्यातील महत्त्वाचे घटक 2010 मध्ये संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र प्रवीण राऊत यांच्या खात्यात 95 कोटी रुपये आले होते. ज्या जमिनींवर गरिबांसाठी सदनिका बांधण्यात येणार होत्या, त्या जमिनी विकून हा पैसा मिळाल्याचा संशय आहे. याच प्रकरणात पुढे सुजित पाटकर हे नाव पुढे आले. सुजितच्या घरावरही ईडीने छापे टाकले होते. सुजितचे संजय राऊत यांच्याशी जवळचे संबंध आहेत. सुजित हा संजय राऊत यांच्या मुलीच्या कंपनीमध्ये भागीदार आहे.

सुजितची पत्नी स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ही जमीनही याच घोटाळ्याच्या पैशातून घेतल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले. दरम्यान, कोरोनाच्या काळात सुजित पाटकरला मुंबई आणि पुण्यातील अनेक कोरोना सेंटर उभारण्याचे मोठे कंत्राट मिळाले. या सेंटर्सच्या कंत्राटात अनियमितता झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी मुंबईतील शिवाजीनगर पोलिसात एफआयआरही दाखल केला आहे. शिवसेनेच्या काही नेत्यांबरोबरच खासदार संजय राऊत यांच्या मागे ईडीचा फेरा लागला आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली असून, ईडीने संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील जमीन जप्त केली आहे. याच प्रकरणात ईडीने 1 जुलै 2022 रोजी संजय राऊत यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी केली होती. या चौकशीनंतर 20 जुलै रोजी ईडीकडून पुन्हा समन्स बजावले होते. मात्र त्यासाठी उपस्थित न राहिल्याने संजय राऊत यांना 27 जुलैला दुसरे समन्स बजावण्यात आले. मात्र पावसाळी अधिवेशनामुळे आपण उपस्थित राहू शकत नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले होते.

प्रवीण राऊत हा शिवसेना नेते संजय राऊत यांचा जवळचा मित्र. या प्रवीण राऊतने हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चरचे राकेश वाधवान, सारंग वाधवान व अन्य संचालकांना हाताशी धरले आणि पत्रा चाळीच्या जमिनीवरील एफएसआय आठ बिल्डरांना 1034 कोटीला विकला. हा मोठाच घोटाळा होता. अशातच त्याची पत्नी माधुरीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 55 लाखांचे बिनव्याजी कर्ज दिले. या पैशातूनच राऊत यांनी दादरमध्ये आलिशान फ्लॅट खरेदी केला. तिथूनच खर्‍या अर्थाने या प्रकरणाशी संजय राऊत यांचे नाव जोडले गेले.

वर्षा राऊत यांच्या खात्यात 55 लाख वळवले

पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पात सुमारे 1 हजार 34 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. याप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ईडी तपास करत आहे. तसेच पंजाब अँड महाराष्ट्र बँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणीही स्वतंत्र गुन्हा दाखल करून ईडी तपास करत आहे. पीएमसी बँक घोटाळ्याच्या तपासादरम्यान गुरू आशिष कंपनीचे नाव समोर आले होते. पत्रा चाळ पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यांत संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांची गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी सहभागी होती. पुढे ही कंपनी त्यातून बाहेर पडली. मात्र या व्यवहारात कंपनीला मोठा फायदा झाला होता. पुढे प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यातून 2010 साली संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात 55 लाख रुपये वळते करण्यात आले होते. या पैशातून संजय राऊत यांनी मुंबईतील दादर परिसरात फ्लॅट आणि अलिबागमधील जमिनी खरेदी केल्याचा आरोप आहे. ईडीने यापूर्वी प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्याकडे चौकशी करून त्यांचे जबाब नोंदविले आहेत.

  • संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत घोटाळेबाज गुरू आशिष कंपनीचे भागीदार.
  • प्रवीण राऊतने एचडीआयएलच्या उपकंपनीच्या संचालकांना हाताशी धरून पत्रा चाळीच्या जमिनीवरील एफएसआय आठ बिल्डरांना 1034 कोटीला विकून महाघोटाळा केला.
  • प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नीला दिलेल्या 55 लाखांच्या कर्जातून घेतला आलिशान फ्लॅट.
  • कंपनीचा पीएमसी बँक घोटाळ्यातही सहभाग स्वप्ना पाटकर आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांनी अलिबागमध्ये घेतलेली जमीन याच घोटाळ्याच्या पैशातून घेतल्याचे उघड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news