रहस्‍यरंजन : व्हेल माशाची ‘उलटी’ सोने, हिऱ्यापेक्षाही महाग; आंतरराष्‍ट्रीय बाजारात कोट्यवधींची किंमत

व्हेल माशाची उलटी
व्हेल माशाची उलटी
Published on
Updated on

उलटी असा शब्द उच्चारला तरी किळस वाटते; पण हीच उलटी जर लाखो-कोटी रुपयांमध्ये विकली जात असेल तर? आश्चर्य वाटले ना? पण हे खरं आहे. ही उलटी आहे व्हेल माशाची. या माशाची उलटी आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींच्या किमतीत विकली जाते. सोने, हिर्‍यापेक्षा अधिक किमतीला ही उलटी विकली जाते; पण ही उलटी येते कुठून? कोणत्याही प्राण्याच्या उलटीमध्ये घटक नाहीत, इतके अमूल्य घटक व्हेल माशाच्या उलटीमध्ये सापडतात. हे एक रहस्यच आहे. व्हेल आकाराने भीमकाय असतात. ते श्वास फक्त हवेत घेऊ शकतात. व्हेलला तिमि असेदेखील म्हटले जाते. निळी तिमि जगातील सर्वात मोठा जलचर आहे, जो हत्ती आणि डायनासोरपेक्षाही मोठ्या आकाराचा असतो. निळी तिमि 30 मीटर (98 फूट) लांब आणि जवळपास 180 टन वजनाची असते.

व्हेल जगभरातील समुद्र आणि महासागरांच्या विश्वात लाखोंच्या संख्येने होते; पण त्यांचे महत्त्व समजू लागताच शिकार होऊ लागली. अनेक देशांमध्ये व्हेलची शिकार करण्यावर बंदी घालण्यात आली. व्हेल माशाच्या उलटीचे उपयोग विविध वस्तूंमध्ये करता येतात. ती किती मौल्यवान आहे, हे समजल्यानंतर तस्करांची नजर या माशांवर राहू लागली. अनेक संशोधक, वैज्ञानिकांच्या मते, व्हेल माशाची उलटीच आहे की, त्याच्या शरीरातील मळ आहे, अद्यापही हे सिद्ध झालेले नाही. व्हेल मासा हा खोल समुद्रात आणि किनार्‍यापासून दूर असतो. त्यामुळे व्हेल माशाची उलटी किनार्‍यावर येण्यासाठी वर्ष लागते, असे मानले जाते. मध्यंतरी कोकणात तळाशी, कोकण किनारपट्टीवर, अहमदाबाद, गुजरात, मुंबई, चेन्नई, ओडिशा, केरळ येथे व्हेल माशाची उलटीची तस्करी करणार्‍यांना पकडले गेले होते. कोकणच्या समुद्रात व्हेल मासा असल्याने अनेक तस्करांची नजर या भागावर असते.

व्हेल मासे समुद्रात विविध पदार्थ खात असतात. काहीवेळा व्हेल माशाच्या शरीरातील अपचन झालेले पदार्थ बाहेर टाकले जातात. वैज्ञानिक भाषेत याला एम्बरग्रीस असे म्हटले जाते. हा ज्वलनशील पदार्थ मानला जातो. व्हेलच्या शरीरातून निघणारा हा पदार्थ काळ्या रंगाचा असतो. तो लगेच कठीण दगडासारखा होतो. त्याचे वजन 15 किलोग्रॅमपासून 50 किलोपर्यंत असते.

व्हेल मासा जो पदार्थ बाहेर टाकतो तो कापसाच्या बोळ्यासारखा दिसणारा असतो. तो नंतर कठीण ठोकळा बनतो, त्याला एम्बरग्रीस असे म्हटले गेले आहे.

एम्बरग्रीस. काळा, फिकट दगडी रंगाचा तेलकट पदार्थ असतो. याचा आकार गोलाकार किंवा अंडाकार असू शकतो. यास व्हेलचं वीर्य किंवा स्पर्मदेखील म्हटले जाते; पण उलटी की स्पर्म? याची माहिती तंतोतत समोर आलेली नाही. काही वैज्ञानिकांच्या मते, व्हेलच्या विष्ठेतून एम्बरग्रीस बाहेर पडतो. एम्बरग्रीस सोन्या-हिर्‍यापेक्षाही खूप महाग आहे. बाजारपेठेत याची साधारणत: किंमत 70 हजार डॉलर असू शकते, असे समजते.

व्हेलने गिळलेल्या अनेक छोट्या-मोठ्या प्राण्यांचे अवयव, टोकदार शरीर, दात असतील, ते व्हेल उलटीच्या माध्यमातून बाहेर सोडून देतो. ही उलटी बाहेर पडताच कठीण ठोकळा बनते, ती समुद्राच्या पाण्यावर तरंगत राहते. असेही म्हटले जाते की, सुरुवातीला दिसायला ती मेणासारखी दिसते. समुद्रातील क्षार आणि सूर्याची किरणे त्यामुळे रासायनिक प्रक्रिया होते. ती चिकट बनते. शेवटी ही उलटी एम्बरग्रीसमध्ये रूपांतरित होते, अशी माहिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत एक ते दीड कोटीपर्यंत असू शकते, म्हणूनच यास समुद्रात तरंगणारे सोने, असेही म्हटले जाते. एम्बरग्रीसचा वापर सौंदर्यप्रसाधने तसेच अत्तर तयार करण्यासाठी केला जातो. काही जण म्हणतात की, त्याला कस्तुरीसारखा सुगंध असतो, तर काहींना मातीसारखा वास येतो, तर काही जण म्हणतात की, एम्बरग्रीसला घोड्याच्या तबेल्यातून येणारा जो वास आहे, तशा प्रकारचा वास असतो; पण नेमके खरे काय माहिती नाही.

अनेक परफ्यूम्स तयार करण्यासाठी याचा वापर होत असतो. तज्ज्ञ म्हणतात की, एकप्रकारचा गोड वास असतो. हवेच्या संपर्कात आल्यानंतर सुवास येऊ लागतो. म्हणूनच आखाती देशांमध्ये उत्तम अत्तर, परफ्यूम्स बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. व्हेलच्या उलटीला अरेबियन देशांमध्ये प्रचंड मागणी असते. याला कोटीची किंमत मोजायला लोक तयार असतात. एवढेच नाही, तर एम्बरग्रीसपासून अगरबत्ती, धूपही तयार केले जाते. सुगंधित सिगारेट तयार करण्यासाठी त्याचा वापर होतो. अनेक शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी उपचारांमध्ये याचा वापर होतो. असे म्हटले जाते की, लैंगिक क्षमता वाढवणार्‍या औषधांमध्येही याचा वापर केला जातो.

एम्बरग्रीस जितके जुने तितकी त्याची किंमत जास्त असते. एम्बरग्रीस समुद्रकिनार्‍यावर पोहोचेपर्यंत हजारो किलोमीटरचा प्रवास होतो. समुद्रातील वादळी वारे, लाटांमुळे ते किनार्‍यावर पोहोचते. अनेक मच्छीमारांंच्या जाळ्यातदेखील ते सापडते. अनेक ठिकाणी व्हेल माशाची उलटी म्हणून तेलकट अथवा चिकट पदार्थ विकून फसवणूकदेखील केली जाते. व्हेल माशांच्या प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी शिकार आणि तस्करीवर बंदी आहे. तरीही छुप्या पद्धतीने तस्कर चोरी करतात. युरोप, अमेरिका, पाश्चिमात्य देशांत या माशाच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. अनेक देशांमध्ये शिकार आणि तस्करी केल्यास मोठ्या दंडाची शिक्षाही आहे.

ऋतुपर्ण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news