Lok Sabha Election 2024 : महुआ मोईत्रांविरोधात राजमाता

Lok Sabha Election 2024 : महुआ मोईत्रांविरोधात राजमाता
Published on
Updated on

पश्चिम बंगालमधील कृष्णानगर मतदार संघातील लढत उत्कंठावर्धक ठरणार आहे. यावेळी बहुचर्चित महुआ मोईत्रा यांना आव्हान देण्यासाठी भाजपने तेथून राजमाता अमृता रॉय यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही लढत आतापासूनच चर्चेचा विषय बनली आहे.

येत्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील कृष्णानगर मतदार संघातील लढत वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. कॅश फॉर क्युरी प्रकरणात खासदारकी गमवावी लागलेल्या महुआ मोईत्रा यांच्याविरोधात भाजपने राजमाता अमृता रॉय यांना रिंगणात उतरविले आहे. तृणमूल काँग्रेसने अर्थातच पुन्हा एकदा मोईत्रा यांना उमेदवारी बहाल केली आहे. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. अमृता राय कृष्णानगरमधील प्रतिष्ठित राजघराण्याच्या राजमाता आहेत. त्यांना यावेळी भाजपकडून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, त्यासाठी भाजपला आधी त्यांचे मन वळवावे लागले. यानंतरच त्यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायला होकार दिला. गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजेच 2019 मध्ये मोईत्रा यांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यावेळी त्यांनी भाजपचे उमेदवार कल्याण चौबे यांना 63 हजारांहून अधिक मतांनी पराभूत केले होते. चोपडा, पलाशीपारा आणि कालीगंज या तिन्ही मतदार संघांतून मोईत्रा यांना तेव्हा मोठी आघाडी मिळाली होती. तथापि, यावेळी भाजपने या तिन्ही ठिकाणी जोरदार तयारी केल्याचे दिसून येते.

राजघराण्याचा प्रभाव, भाजपला फायदेशीर

दुसरीकडे, या मतदार संघात तृणमूलची ताकद आणि संघटना हळूहळू विस्कळीत होऊ लागली आहे. पक्षांतर्गत बेदिली आणि नेत्यांकडून एकमेकांवर केले जाणारे भ्रष्टाचाराचे आरोप, यामुळे तृणमूल काँग्रेस या मतदार संघात पोखरत चालला आहे. याचा फायदा अमृता रॉय यांना होऊ शकतो, अशी राजकीय निरीक्षकांची अटकळ आहे. राजे कृष्ण चंद्र देव आणि कृष्णानगरचा राजवाडा या दोन गोष्टींचा अजूनही बंगाली जनतेच्या मनावर मोठा प्रभाव आहे. अठराव्या शतकात राजे कृष्ण चंद्र देव यांनी प्रशासकीय सुधारणा आणि बंगाली संस्कृतीचे जतन करण्यासाठी मोठे योगदान दिले होते.

मोईत्रा वादाच्या भोवर्‍यात

संसदेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या प्रकरणात मोईत्रा बदनाम झाल्या असल्यामुळे भाजपला त्याचा राजकीय लाभ मिळेल, हे ओघाने आलेच. या प्रकरणात मोईत्रा यांना खासदारकी गमवावी लागली. शिवाय, केंद्रीय तपास संस्थांकडून याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. अशा स्थितीत मोईत्रा यांच्याविरोधात भाजपने तगडा उमेदवार दिल्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष न लागल्यास नवल ते कसले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news