

दानोळी; पुढारी वृत्तसेवा : येथील धरण रस्त्यालगतच्या वीस गुंठे फ्लॉवर पिकावर अज्ञाताने तणनाशक फवारल्याने हातातोंडाला आलेले पीक खाक झाले आहे. यामुळे अंदाजे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबद फिर्याद शीतल डांग यांनी जयसिगपूर पोलिस ठाण्यात दिली आहे. अशा प्रवृत्तीवर कारवाईची मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.
दानोळी -कोथळी रोडलगत धरण रस्त्यावर शितल श्रीपाल डांग यांच्या स्वमालकीच्या शेती गट नं 937 मधील 50 गुंठे जमिनीवर फ्लॉवर पीक घेतले आहे. पीक जोमात वाढले असून काढणीला आले आहे. पण काल मध्यरात्री अज्ञाताने यातील अंदाजे 20 गुंठे फ्लॉवर पिकावर तणनाशक फवारले आहे. त्यामुळे हातातोंडाला आलेले पीक खाक झाले. त्यामुळे शेतकरी वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद शितल डांग यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. गेल्या अनेक वर्षापासून दानोळी परिसरात पिकावर औषध फवारणी करणे. पीक उपटून टाकणे अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.